१५ लाख लिटर पाणी रस्त्यावर !

By Admin | Updated: May 14, 2014 00:27 IST2014-05-13T23:29:23+5:302014-05-14T00:27:17+5:30

सोमनाथ खताळ , बिंदूसरा धरणातून दररोज १५ लाख लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

15 lakh liters of water on the road! | १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर !

१५ लाख लिटर पाणी रस्त्यावर !

सोमनाथ खताळ , बीड पाणीटंचाईमुळे बीडकरांना आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असतानाच बिंदूसरा धरणातून दररोज १५ लाख लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून यातून सतत पाणी वाहत असले तरी याचे गांभीर्य मात्र संबंधितांना नसल्याचेच दिसत आहे. गेली अनेक महिन्यांपासून पाण्याचा हा अपव्यय सुरूच आहे. बीड शहराला सध्या तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेली वर्षभरापासून बीडकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पिण्यासाठी अगदी दररोज विकतचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. वर्षभरात ही परिस्थिती बदलली नाही. आजही शहरातील अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी विकतच घ्यावे लागत आहे. येथील प्रकल्पात हिरवे पाणी असल्याचे ‘लोकमत’ने पालिकेला दाखवून दिले होते. याची नगर परिषदेने दखल घेत मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम.एस.वाघ आणि दुधाळ यांना सोबत घेऊन या धरणाची पाहणी केली होती व प्रत्येक आठ तासाला २५ किलो तुरटी पाण्यात टाकण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता बीडकरांना शुद्ध पाणी पुरवठा होत आहे. परंतु लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे मागील अनेक महिन्यांपासून बिंदुसरा धरणाच्या भिंतीला भलेमोठे भगदाड पडले असून यामधून दररोज १५ ते २० लाख लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच या धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात मोठ मोठी झाडे उगवली आहेत. या झाडांच्या मुळ्या भिंतीत गेल्याने यातून पाण्याचा पाझर होत आहे. मागील अनेक वर्षापासून या धरणाच्या भिंतीची दुरूस्ती केली नसल्याचे तेथील एका कर्मचार्‍याने सांगितले. हजारो लोकांची भागू शकते तहान बिंदुसरा धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडातून दररोज १५ ते २० लाख लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. या वाया जाणार्‍या पाण्यावर शहरातील हजारो नागरिकांची तहान भागू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले. म्हणे ! दोन महिन्यांपूर्वी केली पाहणी बिंदुसरा धरणाला पडलेल्या भगदाडाची दोन महिन्यापूर्वी नाशिक येथील पथकाने पाहणी केली असून या भिंतीची लवकरच दुरूस्ती करण्यात येईल, असे शाखा अभियंता डी.एम.कोकणे यांनी सांगितले. दोन महिन्यापासून अद्यापही या भिंतीची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भिंतीच्या दुरूस्तीला कधी मुहूर्त लागणार? पावसाळ्यात की धरणातील पाणी संपल्यावर? असा प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत मुख्याधिकारी निलावाड म्हणाले, आम्ही याबाबत संबंधित विभागाला पत्र पाठविलेले आहे.

Web Title: 15 lakh liters of water on the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.