१३० खासगी डॉक्टरांना मिळणार प्रशस्तीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST2020-12-29T04:31:40+5:302020-12-29T04:31:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनासारख्या कठीण काळात क्षयरुग्ण शोधण्यासह निदान करण्यात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी आरोग्य विभागाला खूप सहकार्य ...

१३० खासगी डॉक्टरांना मिळणार प्रशस्तीपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनासारख्या कठीण काळात क्षयरुग्ण शोधण्यासह निदान करण्यात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी आरोग्य विभागाला खूप सहकार्य केले. त्याबद्दल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता एकाचवेळी १३० डॉक्टरांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ही आदर्श संकल्पना हाती घेतली आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम हाती घेतलेला आहे. यात नवे क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मागील वर्षभरात जिल्ह्यातील १३० डॉक्टरांनी हे रुग्ण शोधून निदान केले. त्यांना नियमानुसार ५०० रुपये प्रोत्साहन निधीही देण्यात आलेला आहे. परंतु कोरोना काळातही त्यांनी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा आराेग्य विभागाच्या वतीने मंगळवारी दुपारी १२.३० वाजता या सर्व डॉक्टरांना एकाचवेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबत सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सोमवारी पत्र काढले आहे. तसेच ४ ते ६ या वेळेत ऑनलाईन वेबिनार ठेवला आहे. यात ही सर्व माहिती निक्षय ॲपमध्ये भरण्यासह नोंदणी व इतर माहिती जिल्हास्तरावरून दिली जाणार आहे. ही संकल्पना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
कोट
वर्षभरात आणि कोरोना काळातही जिल्ह्यातील १३० खासगी डॉक्टरांनी प्रशासनाला खूप सहकार्य केले. त्यांनी क्षयरुग्ण शोधण्यासह निदान केले. त्यांना ५०० रुपये नियमाप्रमाणे दिले असले तरी त्यांचे योगदानही अमूल्य आहे. त्याबद्दल मंगळवारी दुपारी १२.३० वाजता एकाच वेळी त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
डॉ. आर. बी. पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड