पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार;आरोपीस १२ वर्षे कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 15:43 IST2019-04-11T15:42:55+5:302019-04-11T15:43:38+5:30
पीडितेचा जबाबासह नऊ साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या

पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार;आरोपीस १२ वर्षे कारावासाची शिक्षा
बीड : बीडमधील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी अनिल सुनील पवार (२२) याला १२ वर्षांचा कारावास आणि ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सुनीलने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ११ मे २०१७ रोजी नळाला पाणी आणण्यास घराबाहेर पडलेल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अनिलने दुचाकीवरुन पळवून नेले. हदगाव (ता. परतूर, जि. जालना) येथे नातेवाईकांकडे ते १७ मेपर्यंत राहिले. त्यानंतर अनिल तिला घेऊन हरकी लिमगाव (ता. माजलगाव) येथे पोहोचला. तेथे ते २८ मेपर्यंत राहिले. या दोन्ही ठिकाणी अनिलने तिच्यावर अत्याचार केला. पोउपनि. भूषण सोनार यांनी त्यांचा शोध घेऊन बीडला आणले. दरम्यान, पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर अनिल पवारविरुध्द बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
पोउपनि सोनार यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्या. प्राची कुलकर्णी यांनी साक्षीपुरावे व सरकारी पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन अनिल पवारला दोषी ठरवले. बुधवारी त्यास न्यायालयाने १२ वर्षांची शिक्षा व ३ हजार दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय राख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अमित हसेगावकर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहायक फौजदार सी. एस. इंगळे व महिला कर्मचारी सिंगल यांचे त्यांना सहाय्य लाभले. तपासात पोउपनि सोनार यांना रेवणनाथ दुधाने यांनी सहकार्य केले.
पीडितेचा जबाबासह नऊ साक्षी महत्त्वपूर्ण
या प्रकरणात पीडितेसह वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, पीडितेने ज्या दवाखान्यात जन्म घेतला, तेथील प्रमाणपत्र व डॉक्टरांचा जबाबही महत्त्वाचा ठरला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ९ जणांची साक्ष नोंदविण्यात आली.
कोर्टातून केले होते पलायन
फेब्रुवारी रोजी अनिलला सुनावणीसाठी पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायालयात आणले होते. याचदरम्यान बंदोबस्तावरील तीन कर्मचाऱ्यांना चकवा देत त्याने न्यायालयात पलायन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेने दहा दिवसांनंतर त्याच्या परराज्यातून मुसक्या आवळल्या होत्या.