दुसऱ्या टप्प्यात १२ कोटी ४८ लाख ५० हजारांची मदत - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:48+5:302021-02-05T08:24:48+5:30
वडवणी : मागील वर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ...

दुसऱ्या टप्प्यात १२ कोटी ४८ लाख ५० हजारांची मदत - A
वडवणी : मागील वर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी सरकारने दुसऱ्या टप्प्यात १२ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये निधी तहसीलदारांच्या खात्यावर जमा केला आहे. तहसीलदारांकडून दुसऱ्या टप्प्यात ३६ गावांतील २३ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात येणार आहे.
तालुक्यात २४ हजार ९७० हेक्टर जमीनवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून ३१ हजार ५५१ शेतकरी संकटात सापडले आहेत. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मामला, साळींबा, चिचोटी, बाहेगव्हाण, सोन्ना, देवडी, तिगाव, लक्ष्मीपूर, कवडगाव, खापरवाडी, खडकी, बाबी, लोनवळ, दुकडेगाव, कुप्पा, ढोरवाडी, लिमगाव, काडीवडगाव, देवगाव,पिंपळटक्का, वडवणी, चिखलबीड, देवळा, पिंपरी, चिंचवडगाव, रूई, पिपळा, डावरगाव, कोठारबण, चिंचवण, टोकेवाडी, हिरवगव्हाण, मोरवड, उपळी, पिपरखेड या भागातील २३ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी वडवणी प्रशासनाने २४ कोटी रुपयांची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र शेतकऱ्यांना १० हजार रुपये हेक्टरप्रमाणे २ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत वाटप होणार आहे. तर फळबागेसाठी २५ हजार रुपये हेक्टर मदत होणार आहे. तालुक्यातील ३१ हजार ५५१ लाभार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात १२ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. तो वाटप करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात तहसील प्रशासनाने निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात मदत वाटप सुरू केली आहे.
तहसीलदार सय्यद कलीम यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांची बुधवारी सकाळी कार्यालयात बैठक घेऊन दोन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. अनुदान वितरित करताना बाधित गावांची वर्णमालेनुसार यादी तयार करावी. एकही शेतकरी वंचित राहणार नाही यांची खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
याबाबत तहसीलदार सय्यद कलीम म्हणाले की अतिवृष्टी नुकसानभरपाई पोटी दुसऱ्या टप्प्यात १२ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये निधी प्राप्त झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यात येत आहेत. नायब तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, अव्वल कारकून रवींद्र शहाणे, महसूल साह्यक विष्णू आव्हाड प्रयत्न करत आहेत.