११ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ४८ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:03+5:302021-07-12T04:22:03+5:30
बीड : जूनमध्ये १७ दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैमध्येही हात अखडता घेतल्याचे दिसत आहे. मागील ११ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ...

११ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ४८ मि.मी. पाऊस
बीड : जूनमध्ये १७ दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैमध्येही हात अखडता घेतल्याचे दिसत आहे. मागील ११ दिवसांत जिल्ह्यात सरासरी केवळ ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत हा आकडा वाढणारा दिसत असला तरी खरिपाच्या पिकांसाठी दमदार पावसाची गरज आहे.
यंदा पर्जन्यमान चांगले राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. ८ ते १२ जूनदरम्यान पावसाने आगमनाची हजेरी लावली. मात्र त्यानंतर १२ दिवस पावसाने दडी मारली. पुन्हा दोन-तीन दिवस तुरळक पाऊस झाला. त्यानंतर पात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे कोवळी पिके धोक्यात आली होती. जूनमध्ये अपेक्षित पाऊस १२८.४ मि.मी. सरासरी पाऊस झाला; तर जुलैमधील ११ दिवसांत ४८.६ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
दि. १ ते ११ जुलैदरम्यान बीड तालुक्यात २७.३, पाटोदा ७२, आष्टी ७४, गेवराई ३६, माजलगाव ५०, अंबाजोगाई ४३, केज ५७, परळी ३०, धारूर १००, वडवणी ४७, तर शिरूर तालुक्यात ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५६६.१ मि.मी. आहे. आतापर्यंत २४९.९ मि.मी. पाऊस झाला आहे.
उजनी, पट्टी वडगावात पावसाचे पुनरागमन
उजनी : पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविल्याने कोवळी पिके ऊन धरू लागली होती. अंबाजोगाई तालुक्यातील उजनी, पट्टीवडगाव परिसरामध्ये पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली होती. कडक ऊन पडत असल्याने कोवळी पिके करपून जाण्याची भीती निर्माण झाली होती. रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू झाल्याने परिसरातील पिकांना जीवदान मिळाले आहे.
दुबार पेरणीचे संकट टळले
दरम्यान, रविवारी जिल्ह्यात अंबाजोगाई, माजलगाव, परळी तालुक्यांत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. अंबाजोगाई तालुक्यातील राडी-दैठणा पुलावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली.
सायंकाळी माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस सुरू होता. केज तालुक्यात पावसाची रिमझिम चालू बीड, गेवराई शहरासह परिसरात पावसाची भुरभुर सुरू होती. रविवारी पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना जीवदान मिळाले असून, बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
110721\11_2_bed_20_11072021_14.jpeg
अंबाजाेगाई तालुक्यात राडी-दैठणा पुलावर पावसामुळे मोठया प्रमाणात पाणी आले असल्याने वाहतूक ठप्प झाली आहेी