पुदिना वापरा, सौंदर्य खुलवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 15:09 IST
खमंग भजी, पराठे, चटणी तसेच नॉन व्हेज आदी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी पुदिन्याचा आवर्जून वापर केला जातो. शिवाय पुदिन्याचे अनेक औषधी गुणधर्म असून, बहुतांश रोगांवर त्याचा उपयोग केला जातो.
पुदिना वापरा, सौंदर्य खुलवा !
खमंग भजी, पराठे, चटणी तसेच नॉन व्हेज आदी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी पुदिन्याचा आवर्जून वापर केला जातो. शिवाय पुदिन्याचे अनेक औषधी गुणधर्म असून, बहुतांश रोगांवर त्याचा उपयोग केला जातो. डोके अथवा पोटात दुखत असल्यास पुदिन्याची पाने चघळल्यास आराम मिळतो. अचानक लागलेली उचकी देखील पुदिन्याची पान खाल्ल्याने थांबते. याव्यतिरिक्त पुदिन्याचा वापर सौंदर्य खुलविण्यासाठीही केला जाऊ लागला आहे. पुदिन्याने असे खुलवा सौंदर्यआॅयली त्वचेच्या समस्येवर पुदिना फेशियल करुन सुटका मिळवू शकता. यासाठी दोन मोठे चमचे ताजी वाटलेली पुदिन्याची पाने, दोन मोठे चमचे दही आणि एक मोठा चमचा ओटमील एकत्र करुन याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट दहा मिनिटे चेहऱ्याला लावून नंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे लगेच फरक जाणवून चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंम्पल्सही कमी होण्यास मदत होते. पुदिन्याच्या रसात मुल्तानी माती मिसळून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्यादेखील कमी होतात आणि चेहरा चमकतो. एखाद्या जखमेवर पुदिन्याचा रस लावल्यास घाव लवकर भरुन येतो. त्वचा रोगावर देखील पुदिन्याचा रस उपयुक्त आहे. पुदिन्याच्या सुकलेल्या पानांपासून तयार केलेल्या पावडरचा दंत मंजन प्रमाणे वापर केला जाऊ शकतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि हिरड्या मजबूत होतात. पुदिन्याची पाने, ताजा लिंबाचा रस आणि मध यांचे समान मिश्रण घेवून एकत्र सेवन केल्यास पोटाशी संबधित विकारांपासून आराम मिळतो.