Hair Care: केसांची योग्य ती काळजी न घेतल्यास केसात कोंडा होण्याची आणि त्यामुळे नंतर केसगळतीची समस्या आजकाल अनेकांना होते. खासकरून हिवाळ्यात केसात कोंडा वाढण्याची समस्या जास्त बघायला मिळते. कोंडा आणि तेल एकत्र झाल्याने डोक्याच्या त्वचेवर हे मिश्रण चिकटून राहतं आणि केस खाजवतात. केस खाजवले की, कोंडा कपड्यांवर, खांद्यावर पडतो. अशात चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही केसात कोंड्याची समस्या झाली असेल आणि यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करून ही समस्या लगेच दूर करू शकता. चला तर जाणून घेऊ कोंडा दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर कसा कराल.
कोंडा दूर करेल बेकिंग सोडा
डोक्यावर बेकिंग सोडा लावण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे बेकिंग सोडा असाच डोक्याच्या त्वचेवर पसरवा. हवं तर बेकिंग सोड्यात पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर पसरवा आणि काही वेळ ठेवल्यावर बोटांच्या मदतीने चांगली मालिश करा. नंतर केस पाण्याने धुवून स्वच्छ करा. बेकिंग सोड्यामध्ये अॅंटी-फंगल गुण असतात, याने डोक्याच्या त्वचेची पीएच लेव्हल बॅलन्स होते.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस
बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करू शकता. या पेस्टने डोक्यावर जमा झालेले डेड स्कीन सेल्स, बिल्ड अप आणि कोंडा दूर होते. हे मिश्रण डोक्यावर १० मिनिटे लावून ठेवल्यावर केस धुवून घ्यावे.
बेकिंग सोडा आणि अॅप्पल व्हिनेगर
अॅप्पल सायडर व्हिनेगरने डोक्याच्या त्वचेची चांगली सफाई होते. याने डोक्याच्या त्वचेचं पीएच बॅलन्स होतं. एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि यात अॅप्पल व्हिनेगर टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावा आणि नंतर काही वेळाने केस धुवून घ्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास लगेच फरक दिसेल.
बेकिंग सोडा आणि पदीना
हे मिश्रण तयार करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यात पेस्ट बनेल इतका पदीन्या रस टाका. ही पेस्ट डोक्यावर लावून मालिश करा. अर्ध्या तासाने केस धुवून घ्या. कोंडा दूर झालेला दिसेल.
बेकिंग सोडा आणि खोबऱ्याचं तेल
बेकिंग सोडा आणि खोबऱ्याचं तेल मिक्स करून लावल्यास कोंड्याची समस्या दूर होते. सोबतच डोक्याच्या त्वचेला आणि केसांना पोषणही मिळतं. हे मिश्रण तयार करण्यासाठी एक चमचा खोबऱ्याचं तेल, एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा मध मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट डोक्यावर लावा आणि अर्धा तास तशीच लावून ठेवा. नंतर केस पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास कोंडा दूर होईल.