तनयवर शुभेच्छांचा वर्षाव !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 18:05 IST2016-09-08T12:35:21+5:302016-09-08T18:05:21+5:30
प्रेक्षकांच्या वोटिंगमुळे स्टार प्लस वाहिनीवरील डान्स प्लस स्पर्धेत अंतिम ४ स्पर्धकात पोहोचलेला तनय मल्हारा फिनाले पूर्वी जळगावकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी जळगावला आला......
.jpg)
तनयवर शुभेच्छांचा वर्षाव !
सकाळी ७. १५ वाजता तनयचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यावेळी सेंट टेरेसा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बँडपथकाने त्याचे जोरदार स्वागत केले.
स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर प्रथम तनयने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रॅलीला सुरुवात होऊन खान्देश सेंट्रल मॉल येथे अनेक मान्यवरांनी तनयचे स्वागत करून शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे स्टेडियम, स्वातंत्र्य चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक, प्रभात चौक, मू.जे. महाविद्यालय, सागर पार्क, काव्य रत्नावली चौक मार्गे सेंट टेरेसा शाळेत पोहचली व तेथे रॅलीचा समारोप झाला.
घोषणांनी दुमदुमले जळगाव
तनयची रॅली शिवाजी पुतळ्यामार्गे बेंडाळे महाविद्यालयाजवळ आल्यानंतर शाळकरी व महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी ‘तनय हमारा सुपरसस्टार’, ‘जलगाँव का दुलारा तनय मल्हारा’, ‘जितेंगा भाई जितेंगा तनय हमारा जितेंगा’ सारख्या घोषणा दिल्या.
सेल्फी, फोटोसाठी झुंबड
मू.जे. महाविद्यालयात तर विद्यार्थी, विद्यार्थिंनींनी तनयला अक्षरश: गराडा घातला. महाविद्यालय परिसरासह इतर ठिकाणीही सेल्फी तसेच फोटो घेण्यासाठी झुंबड उडाली.
आले उत्सवाचे स्वरूप़़ तनयच्या स्वागतासाठी विविध शाळा, महाविद्यालय, संस्थातर्फे रांगोळी काढल्याचे तसेच रंगीबेरंगी फुगे, ढोल-ताशे, तनयच्या नावाचे टी-शर्ट, कॅप वाटल्याचे, पोस्टर लावल्याचे दिसून आले. यामुळे जळगाव शहराला उत्सवाचे स्वरूप आले होते.
जिल्हा क्रीडा संकुलमध्ये जैन स्पोर्ट अकॅडमीतर्फे स्वागत करण्यात आले. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, फारुक शेख आदी उपस्थित होते. जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि. प. अध्यक्ष प्रयाग कोळी, सुशील नवाल, नंदकुमार बेंडाळे, नगरसेवक अनंत जोशी आदींनी तनयचे स्वागत केले. सेंट टेरेसा स्कूलमध्ये प्राचार्या ज्युलिएट म्हणाल्या तनयचा आम्हाला आभिमान आहे. तर ‘शाळेने खूप काही दिले. तुमच्या प्रेमामुळे अतिशय भरून आले आहे शब्द सूचत नाहीत.’ असे तनय म्हणाला.
श्री जैन नवयुवक मंडळाच्यावतीने आयोजित तनय मल्हारा याच्या डान्स शोला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळून तरुणाईने धमाल केली. या वेळी आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, रतनलाल बाफना, संघपती दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, करीम सालार आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण छाजेड यांना प्रास्ताविक तर उपाध्यक्ष नीलेश जैन यांनी सूत्रसंचालन केले.