(Image Credit : www.dietdoctor.com)
आंघोळ करताना किंवा आंघोळ केल्यावर आरशासमोर केस करताना खाली केसांचा पडलेला दिसणं हे अनेक घरांमध्ये बघायला मिळणारं चित्र आहे. कारण वेगवेगळ्या कारणांनी केसगळतीची समस्या महिला आणि पुरूषांना कमी वयातही भेडसावत आहे. पुरूषांना तर या समस्येने चांगलंच हैराण केलं आहे. फार लहान वयातही अनेकांना टक्कल पडतं आणि ते चारचौघात चर्चेचा विषय ठरतात. याचं मुख्य कारण आहे बदलती लाइफस्टाइल आणि आहाराकडे केलं जाणारं दुर्लक्ष. अनेकजण शरीराला आवश्यक पौष्टीक आहारच घेत नाहीत. त्यामुळे त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो.
काय आहे कारण?
केसगळतीचे दोन मुख्य कारणे आहेत. केसांची योग्य काळीज न घेणे आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता असणे. जर तुम्ही केसांची योग्य ती काळजी घेत असाल तरीही केसगळतीची समस्या असेल तर याचा अर्थ हा होतो की, तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे. आजकाल लोकांचं खाणं-पिणं आणि लाइफस्टाइल फार बदलली आहे. ज्यामुळे केसांच्या विकासासाठी आवश्यक व्हिटॅमिन आणि प्रोटीन्स शरीराला मिळत नाहीत.
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुटतात केस
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केसांना दोन तोंड फुटणे, केस तुटणे आणि केसगळती सुरू होते. त्यामुळे आहारात तुम्ही संत्री, लिंबू, जांभळं, कलिंगड आणि टोमॅटोचा समावेश करावा. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर तुम्हाला व्हिटॅमिन सी ची फार गरज पडेल. त्यामुळे धुम्रपाम सोडून फळांचं सेवन करा.
प्रोटीन असलेला आहार
प्रोटीनमुळे गेलेल्या केसांच्या जागी नवीन केस येण्यास मदत होते. प्रोटीन जर कमी असेल तर केस पातळ, ड्राय आणि कमजोर होतात. त्यामुळे केसगळती होऊ लागते. यावर उपाय म्हणून धान्य, ड्रायफ्रूट्स, दूध, पनीर, मासे, अंडी, चिकनचं सेवन करावं. जर तुम्हाला नॉनव्हेज चालत नसेल तर व्हेज पदार्थ खावे ज्यातून प्रोटीन्स मिळतील.
दूध आणि दुधापासून तयार पदार्थ
जर केसगळती फार जास्त असेल तर दुधापासून तयार प्रॉडक्टचं सेवन करायला हवं. केस हे प्रोटीनपासून तयार होतात आणि डेअरी उत्पादनांमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. दुधात कार्बोहायड्रेट, व्हिट्रमिन्स, मिनरल्स असतात जे केसांच्या विकासासाठी गरजेचे असतात. दही आणि स्किम्ड मिल्कमध्येही व्हिटॅमिन ए भरपूर असतं.
धान्य आणि डाळी गरजेच्या
धान्यांमध्ये झिंक, व्हिटॅमिन बी आणि आयर्नसारखे पोषक तत्व आढळतात. जे केसांसाठी फार महत्त्वपूर्ण असतात. झिंक सुद्धा केस मजबूत, जाड आणि लांब होण्यासाठी फायदेशीर ठरतं. जर तुम्ही नियमितपणे झिंकयुक्त आहाराचं सेवन कराल तर तुम्हाला चांगलाच फायदा होईल. आपल्या डोक्याच्या त्वचेवर ज्या तेल ग्रंथी असतात, त्या तेल उत्पन्न करण्याचं काम करतात आणि या कमी झाल्या तर डोक्याची त्वचा कोरडी होते. यामुळेही केसगळती होऊ लागते. त्यामुळे भरपूर प्रमाणात झिंकयुक्त पदार्थांचं सेवन करावं.
भाज्या आणि फळे
केसांसोबतच आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगांना पुरेसं ऑक्सिजन आणि रक्त मिळावं यासाठी हिमोग्लेबिनची गरज असते. कॉफरच्या मदतीने अधिक हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत मिळते. हे कमी असेल तर केस कमजोर आणि नाजूक होतात. ज्यामुळे केसगळती होते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न, कॉपर, अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन बी, सी व इ आढळतात. सोबतच यात पोटॅशिअम, ओमेगा-३ आणि कॅल्शिअम सुद्धा असतं. या तत्वांमुळे केसगळती होत नाही.