The talented basketball player Khushi will carry the magic on US courts | प्रतिभावान बास्केटबॉलपटू खुशीची जादू चालणार अमेरिकेतील कोर्टवर
प्रतिभावान बास्केटबॉलपटू खुशीची जादू चालणार अमेरिकेतील कोर्टवर

ठळक मुद्देया स्पर्धेत खेळणारी महाराष्ट्राची पहिली आणि भारतातील चौथी खेळाडू ठरली आहे.दोन वर्षांसाठी मिळणार ५० लाख रुपयांची शिष्यवृत्ती सिनिअर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्नऔरंगाबादची खुशी डोंगरे आता अमेरिकेत खेळणार

- जयंत कुलकर्णी

औरंगाबाद : कमी वयातच यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणारी औरंगाबादची प्रतिभावान बास्केटबॉलपटू खुशी डोंगरे हिची अमेरिकेतील एएसए मियामी वूमेन्स बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. ती या संघाकडून अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित अशा कॉलेज बास्केटबॉल स्पर्धेत खेळणार आहे. याविषयीचा तिचा नुकताच करार झाला आहे.

खुशी डोंगरे हिची निवड ही तिने एनबीए अकॅडमीत दाखवलेल्या चमकदार कामगिरीमुळे झाली आहे. तिची याआधी गतवर्षी आणि यंदा अशा दोन वेळेस एनबीए अकॅडमीअंतर्गत वूमेन्स प्रोग्रामच्या शिबिरासाठी निवड झाली. या दोन्ही वेळेस तिने अनुक्रमे बेस्ट टीम मेट अवॉर्ड आणि प्रशिक्षकांतर्फे सर्वोत्तम खेळाडूंसाठी दिला जाणारा कोचेस अवॉर्डही पटकावला. एनबीए अकॅडमीतील दर्जेदार खेळाडूंना अमेरिकेत स्पॉन्सर केले जाते व त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी एनबीएचे प्रशिक्षक ब्लेअर हार्डिएक आणि जेनिफर एझी हे दर्जेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे व्हिडिओ अमेरिकेतील कॉलेजला दाखवतात व त्याआधारे अमेरिकेतील संघ त्या खेळाडूंची माहिती घेतात व त्यांच्या संघासाठी निवड करतात. त्यानुसार खुशी डोंगरे हिची अमेरिकेतील एएसए मियामी वूमेन्स बास्केटबॉल संघात निवड झाली. याविषयी एएसए कॉलेजचे केव्हिन जॉन्सन यांनी खुशी डोंगरे हिच्याशी नुकतीच चर्चा केली व तिची निवड झाल्याचेही कळवले. त्यामुळे खुशी डोंगरे हिला अमेरिकेत कॉलेज बास्केटबॉल साखळी स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. कॉलेज बास्केटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी तिला दोन वर्षांसाठी ५0 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी निवड झालेली खुशी डोंगरे ही महाराष्ट्राची पहिली आणि भारतातील चौथी खेळाडू ठरली आहे. खुशी डोंगरे हिच्याआधी या स्पर्धेसाठी कविता अकुला (छत्तीसगड), संजना रमेश (कर्नाटक), वैष्णवी यादव (उत्तर प्रदेश) यांचीही निवड झाली होती.

खुशी डोंगरे हिने याआधी दोनदा भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने २0१७ मध्ये १६ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करताना आपला ठसा उमटवला होता. त्याचप्रमाणे याच वर्षी मलेशियातील सायबरजमा येथील थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. फेडरेशन चषकासह ८ वेळेस राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा गाजवणाऱ्या खुशी डोंगरे हिने खेलो इंडिया स्पर्धेतही आपला विशेष ठसा उमटवला आहे.

...त्यामुळे बास्केटबॉलकडे वळली खुशी
बास्केटबॉल खेळण्याआधी खुशी जिम्नॅस्टिक आणि कुस्तीही खेळायची. तथापि, तिचे वडील संजय डोंगरे यांनी बास्केटबॉल खेळासाठी औरंगाबाद चॅम्पियन्स क्रीडा मंडळाची स्थापना केली. संजय डोंगरे हे स्वत: बास्केटबॉल खेळायचे. त्यामुळे २0१४ मध्ये तेथे खुशीही चॅम्पियन्स क्रीडामंडळाच्या बेगमपुरा येथे बास्केटबॉल मैदानावर सरावाप्रसंगी जाऊ लागली; परंतु तेथील ज्युनिअर व सिनिअर खेळाडूही तू कधी बास्केटबॉल खेळू शकत नाहीस असे हिणवायचे. त्यामुळे खुशीमध्ये जिद्द वाढली आणि ती बास्केटबॉल खेळाकडे वळली. प्रशिक्षक संदीप ढंगारे आणि वडील संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने बास्केटबॉल खेळाचा श्रीगणेशा केला. २0१५ मध्ये तिची जिल्ह्याच्या संघात निवड झाली; परंतु तिला अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. ही बाब तिच्या मनाला चांगलीच बोचली आणि स्वत:ला बास्केटबॉल खेळात सिद्ध करायचे व भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे याची जिद्द तिने बाळगली.

संधीचे सोने करण्याचा प्रयत्न 
कॉलेज बास्केटबॉल ही अमेरिकेतील सर्वात मोठी लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत भारतातील फार कमी खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. या स्पर्धेसाठी निवड होणे ही मी गॉडगिफ्ट समजते. माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवण्याचा आणि मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. अमेरिकेतील वूमेन्स नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (डब्ल्यूएनबीए) ही प्रतिष्ठित स्पर्धा खेळण्याचे सर्व बास्केटबॉलपटूंचे स्वप्न असते आणि हे स्वप्न माझेही आहे. अर्थात सिनिअर भारतीय संघाकडून आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याचे माझे मुख्य ध्येय आहे.
- खुशी डोंगरे, (आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू)


Web Title: The talented basketball player Khushi will carry the magic on US courts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.