The future of women's basketball is bright | महिला बास्केटबॉलचे भवितव्य उज्ज्वल
महिला बास्केटबॉलचे भवितव्य उज्ज्वल

मुंबई : भारताच्या युवा महिला खेळाडूंसाठी आयोजिण्यात आलेले विशेष शिबिर पाहून खूप आश्चर्य वाटले आणि येथे उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधाही शानदार आहेत. या शिबिरातून सिद्ध झाले आहे, की भारतीय बास्केटबॉलमधील महिला खेळाडूंचे भवितव्य खूप उज्ज्वल आहे,’ असे मत भारतीय महिला बास्केटबॉल संघाची माजी कर्णधार दिव्या सिंग हिने सोमवारी व्यक्त केले.
देशातील अव्वल १८ महिला खेळाडूंसाठी नवी दिल्ली येथे आयोजिण्यात आलेल्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट टेÑनिंग सत्राला दिव्याने भेट दिली. यावेळी तिने भारताच्या युवा खेळाडूंसह संवाद साधत त्यांना मोलाच्या टिप्सही दिल्या. ग्रेटर नोएडा येथील एनबीए अकादमी येथे २७ ते २९ मेदरम्यान मुलींसाठी आयोजिण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये १९९६ ची आॅलिम्पिक सुवर्णपदकविजेती आणि महिला बास्केटबॉल हॉल आॅफ फेम सदस्या जेनिफर अझ्झी, २००४ ची आॅलिम्पिक सुवर्णविजेती आणि दोने वेळची डब्ल्यूएनबीए चॅम्पियन रुथ रिले, माजी डब्ल्यूएनबीए खेळाडू एबॉनी हॉफमन आणि माजी महाविद्यालयीन प्रशिक्षक ब्लेर हार्डिएक या दिग्गजांकडूनही युवा खेळाडूंना मार्गदर्शन मिळत आहे.
या शिबिरादम्यान युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तर आणि व्यावसायिक सामन्यांतील अनुभवांची माहिती देण्यात आली. ‘गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिरातून एक गोष्ट निश्चित झाली, की भारतीय महिला बास्केटबॉलचे भवितव्य खूप उज्ज्वल आहे. शिवाय या खेळाडूंमध्ये मोठी गुणवत्ताही आहे. या शिबिरातून या सर्व खेळाडूंना आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी आत्मविश्वास मिळेल,’ असे दिव्या सिंगने यावेळी म्हटले.

Web Title: The future of women's basketball is bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.