जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचे रौप्यपदकावरच समाधान; कॅरोलिन मरिनला जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 14:34 IST2018-08-05T14:02:21+5:302018-08-05T14:34:23+5:30
सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. पण ही आघाडी तिला टिकवता आली नाही. दुसऱ्या गेममध्ये तर मरिनच्या खेळापुढे सिंधूची हतबलता पाहायला मिळाली. त्यामुळेच सिंधूच्या सुवर्णपदकाची आशा विरुन गेली आणि तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूचे रौप्यपदकावरच समाधान; कॅरोलिन मरिनला जेतेपद
नानजिंग (चीन) : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत कसा खेळ करायला हवा, याचा उत्तम वस्तुपाठ स्पेनच्या कॅरोलिन मरिनने दाखवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. पण ही आघाडी तिला टिकवता आली नाही. दुसऱ्या गेममध्ये तर मरिनच्या खेळापुढे सिंधूची हतबलता पाहायला मिळाली. त्यामुळेच सिंधूच्या सुवर्णपदकाची आशा विरुन गेली आणि तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मरिनने सिंधूवर 21-19, 21-10 असा विजय मिळवला. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते, यावेळीही तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.
पहिला गेम सिंधूने हातातला गमावला. पहिल्या गेममध्ये सिंधूने 14-9 अशी दमदार आघाडी घेतली होती. पण त्यानंतर मरिनने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर मरिनने गुण मिळवण्याचा सपाटा लावला. मरिनने सहा गुणांची कमाई करत सिंधूशी 15-15 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींनीही जोरदार आक्रमण लगावत 18-18 अशी बरोबरी साधली. पण त्यानंतर पुन्हा एकदा मरिनने सर्वोत्तम खेळाची प्रचिती आणून देत 21-19 असा पहिला गेम जिंकला.
पहिला गेम पिछाडीवरुन जिंकल्यावर मरिनचे मनोबल कमालीचे उंचावले. दुसऱ्या गेममध्ये मरिनने सिंधू निष्प्रभ केले. दुसऱ्या गेममध्ये मरिनच्या खेळापुढे सिंधू हतबल झाली आणि त्यामुळे तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.
सिंधूने गेल्यावर्षी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला जेतेपद पटकावता आले नव्हते. त्यापूर्वी 2013 आणि 2014 या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या सामन्यापूर्वी सिंधू आणि मरिन यांच्यामध्ये 12 सामने झाले होते. या दोघींनीही 12 पैकी प्रत्येकी सहा सामने जिंकले होते.