जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी सिंधू सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 00:39 IST2018-09-11T00:39:17+5:302018-09-11T00:39:29+5:30
आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेती भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू मंगळवारपासून सुरु होत असलेल्या जपान ओपनमध्ये अंतिम फेरीत पराभूत होण्याचे दुष्टचक्र भेदण्यास प्रयत्नशील आहे.

जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी सिंधू सज्ज
टोकियो : आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेती भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू मंगळवारपासून सुरु होत असलेल्या जपान ओपनमध्ये अंतिम फेरीत पराभूत होण्याचे दुष्टचक्र भेदण्यास प्रयत्नशील आहे. सिंधूने यंदा सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये रौप्यपदक पटकावले. त्यात राष्ट्रकुल स्पर्धा, विश्व चॅम्पियनशिप आणि आशियाई गेम्सचा समावेश आहे.
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला प्रदीर्घ कालावधीपासून फायनलचा अडथळा पार करता आलेला नाही. ती आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या सयाका ताकाहाशीविरुद्धच्या लढतीने करेल. उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ तीनवेळची विश्वचॅम्पियन कॅरोलिना मारिया किंवा जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध पडण्याची शक्यता आहे. आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणॉय विश्व चॅम्पियनशिप व आशियाई क्रीडामधील अपयश पुसून टाकण्याच्या निर्धाराने उतरतील. श्रीकांतला पहिल्या फेरीत चीनच्या हुआंग युशियांगच्या तर प्रणयला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. समीर वर्माची लढत कोरियाच्या ली डोंग कियुनसोबत होईल. त्याचवेळी, बी. साई प्रणितने स्पर्धेतून माघार घेतली आहे. (वृत्तसंस्था)