पीबीएल; पी.व्ही सिंधूचा 'निन्जा वॉरीयर'वर विजय, ताय त्जु यिंग पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 23:27 IST2018-01-06T21:04:15+5:302018-01-06T23:27:58+5:30
प्रीमीयर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) लढतीत भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि निन्जा वॉरीयर ताय त्जु यिंग यांच्यातील चुरशीच्या लढतीत १५-११, १०-१५, १५-१२ असा विजय मिळवला.

पीबीएल; पी.व्ही सिंधूचा 'निन्जा वॉरीयर'वर विजय, ताय त्जु यिंग पराभूत
- आकाश नेवे
चेन्नई- प्रीमीयर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) लढतीत भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि निन्जा वॉरीयर ताय त्जु यिंग यांच्यातील चुरशीच्या लढतीत १५-११, १०-१५, १५-१२ असा विजय मिळवला.
चेन्नईतील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडिअममध्ये झालेल्या या लढतीतील पहिला गेम खुपच चुरशीचा ठरला. अहमदाबाद संघातील सहकारी एच.एस.प्रणॉय याने निन्जा वॉरीयर म्हणून गौरवलेल्या ताय त्जु यिंग हिने सामन्यातील या गेमची सुरूवात जोरदार केली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या सिंधुला तीने मागे टाकले.सलग तीन गुण घेतले. सिंधुच्या चुकीने यींगला पाचवा गुण देखील बहाल केला. एकवेळ सिंधू १०-६ अशी मागे होती. मात्र सिंधूने सलग पाच गुण घेत यिंगवर दडपण आणले आणि ११-११ अशी बरोबरी साधली. नंतर सलग चार गुण घेत गेम आपल्या नावावर केला.
दुसरा गेम सिंधूसाठी फारसा लाभदायी ठरला नाही. या गेममध्ये सिंधू सुरूवातीपासूनच पिछाडीवर होती. यिंग हिने वेगवान खेळी करत सिंधूला १५-१० असे पराभूत करत सामना तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये नेला. या गेममध्ये यिंग हिने आपल्या दमदार स्मॅशच्या जोरावर सिंधूविरोधात गुणांची कमाई केली.
तिसऱ्या गेममध्ये काही चांगल्या रॅलीज् रंगल्या. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आपला अनुभव पणाला लावला. रंगलेल्या रॅली सिंधू हिने गुण मिळवत १२-१० अशी आघाडी घेतली मात्र यिंग हिने नंतर सलग दोन गुण मिळवत १२-१२ अशी बरोबरी साधली. मात्र सिंधू हिने दमदार खेळी करताना सलग तीन गुण घेत विजय नोंदवला.
पुरूष दुहेरीच्या पहिल्या लढतीत अहमदबाद स्मॅश मास्टर्सच्या किदाम्बी नंदगोपाल आणि लीन चु हेई यांनी चेन्नईच्या ख्रिस अॅडकॉक आणि ली यांग यांचा १५-१३, १५-१२ असा पराभव केला. अहमदबाद स्मॅश मास्टर्सच्या सौरभ वर्मा याने िब्रस लेव्हरडेज याला
१२-१५,१५-१४, १५-१२ असे पराभूत केले.
मिश्र दुहेरीच्या सामन्यात चेन्नईच्या सिंधू आणि बी.सुमित रेड्डी यांनी अहमदबादच्या कामिला रेटर झुल आणि ली चुन हेई रेगीनाल्ड यांना १५-१४,१५-१३ असे पराभूत केले.
प्रणॉय पराभूत
चेन्नईच्या तान्सोंगास्क साएनसोमबुनुस्क याने अहमदाबाद स्मॅश मास्टर्सचा एचएस प्रणॉय याला १०-१५, १५-१२,१५-१४ असे पराभूत केले. या सामन्यातील तिसरा गेम चुरशीचा ठरला. प्रणॉय याने १४-११ अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर तान्सोंगास्क याने सलग तीन गुण घेत प्रणॉयला पराभवाचा धक्का दिला. अखेरच्या गुणासाठी दोघांमध्ये रॅली जोरदार रंगली. मात्र तान्सोंगास्क याने एक अप्रतिम स्मॅश मारत चेन्नईला विजय मिळवून दिला.