ग्वांग्झू : ऑलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू हिने विश्व टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बुधवारी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली सध्याची विजेती अकाने यामागुची हिचा सरळ गेममध्ये पराभव करीत विजयी दिमाखात सलामी दिली. दुबईत गतवर्षी उपविजेतेपद पटकविणाऱ्या सिंधूने संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख ताळमेळ साधला. जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर सिंधूने २४-२२, २१-१५ अशा फरकाने विजय नोंदविला.स्पर्धेत तिसऱ्यांदा सहभागी झालेल्या सिंधूने अनेक वेळा माघारल्यानंतरही संयमी खेळ करत पहिला गेम २७ मिनिटांत जिंकला. सिंधू पहिल्या टाईमआऊटच्या वेळी ६-११ अशी माघारली होती. त्यानंतर मुसंडी मारून प्रतिस्पर्धी खेळाडूसोबत बॅकहॅन्ड फटक्यांसह १९-१९ अशी बरोबरी साधली. यावेळी उभय खेळाडूंच्या मानसिक कणखरतेची कसोटी होती. त्यात सिंधूने सरशी साधून गेम जिंकला. दुसºया गेममध्ये यामागुचीने बॅकहँडच्या फटक्यासह सिंधूवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. सिंधूने हे आव्हान समर्थपणे पेलून ३-१ अशी आघाडी संपादन केली. दरम्यान सिंधूच्या एका चुकीमुळे जपानच्या खेळाडूला ६-३ अशी आघाडी मिळविता आली. यामागुचीला सिंधूने नेटजवळ व्यस्त ठेवून पुन्हा ८-७ अशी आघाडी घेतली. यामागुची देखील हार मानायला तयार नव्हतीच. टाईमआऊट झाला तेव्हा यामागुचीकडे ११-१० अशी आघाडी होती. ब्रेकनंतर सिंधूने जपानी खेळाडूच्या दोन चुकांचा लाभ घेतला. पाठोपाठ गुण संपादन करणाºया सिंधूची आघाडी १८-११ अशी झाली. यामागुचीने नेटवर शॉट मारताच सिंधूला मॅच पॉर्इंट मिळाला. यामागुचीने पुन्हा नेटवर शटलमारताच सिंधूने गेम आणि सामना जिंकला. या स्पर्धेत प्रत्येक गटातील दोन खेळाडू उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर बाद फेरीसाठी ड्रॉ होईल. यंदाच्या मोसमातीलअखेरच्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेले आठ खेळाडू सहभागी झाले आहेत.समीर वर्मा पराभूतपुरुष एकेरीत समीर वर्मा पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. किदाम्बी श्रीकांतनंतर स्पर्धेची पात्रता गाठणाºया समीरला जगातिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या विश्व चॅम्पियन केंटो मोमोता याच्याकडून १८-२१, ६-२१ असा धक्का बसला. सय्यद मोदी ग्रांप्री जेतेपद कायम राखणाºया समीरला आता थायलंडचा केंटाफोन वांगचारोन आणि इंडोनेशियाचा टॉमी सुगियातो यांचा पराभव करावा लागेल.
पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत दिला जपानच्या अकाने यामागुचीला पराभवाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:12 IST