कोरिया ओपन बॅडमिंटन: सिंधू, प्रणीत, सायना पहिल्याच फेरीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:05 AM2019-09-26T02:05:39+5:302019-09-26T06:59:11+5:30

पी. कश्यपची विजयी सलामी

Korea Open Badminton: Sindhu, Pranet, Saina lose in first round | कोरिया ओपन बॅडमिंटन: सिंधू, प्रणीत, सायना पहिल्याच फेरीत पराभूत

कोरिया ओपन बॅडमिंटन: सिंधू, प्रणीत, सायना पहिल्याच फेरीत पराभूत

Next

इंचियोन : विश्वविजेती स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिला कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी झालेल्या सामन्यात तिला बिवेन झँग हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. त्याचवेळी, सायना नेहवाल आणि बी. साईप्रणीत यांनाही पहिल्या फेरीत बाहेर व्हावे लागले. पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप यााने मात्र विजयासह आव्हान कायम राखले. कश्यपने चिनी तैपईचा ल्यू चिया हुंग याच्यावर ४२ मिनिटात २१-१६, २१-१६ ने विजय साजरा केला.

चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळाव्या लागलेल्या सिंधूला अमेरिकेच्या झँग हिने ७-२१, २४-२२, २१-१५ असे पराभूत केले. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने झँगला पराभूत केले होते. हा सामनाही याच महिन्यात झाला होता. बुधवारी झँगने सिंधूविरुद्धच्या पराभवाचा वचपा काढला. क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूसाठी हा सामना अत्यंत सोपा होता. पहिल्या गेममध्ये सिंधूने झँगला २१-७ असे एकतर्फी पराभूत केले. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूला कडवी झुंज मिळाली आणि अखेर दोन गुणांच्या फरकाने झँगने बरोबरी साधली.

दोघींनी १-१ गेम जिंकल्यानंतर तिसरा गेम खूपच रंगतदार होणार, अशी अपेक्षा होती. त्यानुसार खेळ रंगला, पण त्यात झँग सरस ठरली. विश्व चॅम्पियन बनल्यापासून सिंधूलादेखील लय गमावल्यासारखे वाटत आहे. मागच्या आठवड्यात चीन ओपनच्या दुसºयाच फेरीत ती पराभूत झाली. चीनमध्ये जन्मलेली अमेरिकेची झँग हिने मागच्या वर्षी इंडियन ओपन आणि डेन्मार्क ओपनमध्ये सिंधूवर विजय साजरा केला होता.

दुसरीकडे बी. साईप्रणीत याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. डेन्मार्कच्या अँडर्स अँटन्सन याच्याविरोधात सलामीचा सामना खेळताना तो निवृत्त झाला. साईप्रणीतने पहिला गेम २१-९ असा गमावला होता. दुसºया गेममध्ये तो ११-७ ने पिछाडीवर होता. त्याच वेळी त्याने माघार घेतली. टाच दुखू लागल्याने त्याला कोर्टवर खेळण्यात अडचण निर्माण होऊ लागली. त्यामुळे नाईलाजाने अखेर त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला.

त्याचप्रमाणे लंडन ऑलिम्पिकची कांस्य विजेती सायना नेहवाल हिनेही द. कोरियाची किम गा युन हिच्याविरुद्धचा सामना अर्ध्यातून सोडून दिला. पहिला गेम २१-१९ असा जिंकून शानदार सुरुवात केलेल्या सायनाला दुसरा गेम १८-२१ असा गमवावा लागला. तिसºया गेममध्ये सायनाकडून पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र, यीनने सुरुवातीपासून पकड मिळवत ८-१ अशी आघाडी घेतली. याचवेळी पोटदुखीमुळे सायनाला अडचण येऊ लागली. यावेळी ती खूप थकलीही होती. पुढे खेळणे शक्य नसल्याचे जाणवल्यानंतर सायनाने माघार घेतली. (वृत्तसंस्था)

सायनाला पुन्हा पोटाचा त्रास
सायनाचा पती आणि सहकारी खेळाडू पारुपल्ली कश्यप याने दिलेल्या माहितीनुसार सायनाने पोटदुखीमुळे सामना सोडून दिला. यंदा सुरुवातीपासूनच सायनाला हा त्रास जाणवत आहे. तिला भोवळ आली होती. आज ती थेट रुग्णालयातून कोर्टवर पोहोचली होती. यानंतरही सायना विजयी होऊ शकली असती. पण सामना तीन गेमपर्यंत लांबल्यामुळे तिच्यात त्राण उरले नव्हते. सायनासाठी हे वर्ष फारच त्रासदायक ठरत आहे. याआधी दोन्ही सामन्यात सायनाने युनवर विजय मिळविला होता, हे विशेष. सत्राच्या सुरुवातीला इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर सायना सतत पराभवाचे तोंड पाहत आहे.

Web Title: Korea Open Badminton: Sindhu, Pranet, Saina lose in first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.