BWF World C’ship 2019 final : perfect birthday gift for mom, say world champion PV Sindhu | BWF World C’ships 2019 final : सुवर्णपदक जिंकून सिंधूनं आईला दिलं बर्थ डे गिफ्ट

BWF World C’ships 2019 final : सुवर्णपदक जिंकून सिंधूनं आईला दिलं बर्थ डे गिफ्ट

स्वित्झर्लंड, जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे आज सिंधूच्या आईचा वाढदिवस आहे आणि हे सुवर्णपदक आईला बर्थ डे गिफ्ट असल्याचे मत सिंधूनं सामन्यानंतर व्यक्त केले.

सिंधूने पहिल्या गेमपासूनचा आक्रमक खेळ करताना ओकुहाराला डोकं वर काढूच दिले नाही. गणपती बाप्पा मोरया आणि वंदे मातरम् च्या गजर स्वित्झर्लंडमध्येही दुमदुमला. सिंधूच्या आक्रमक खेळाने तिच्या पाठीराख्यांचा उत्साह आणखी वाढवला. सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ करताना अवघ्या 16 मिनिटांत पहिला गेम 21-7 असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग 8 गुणांची कमाई केली. 

दुसऱ्या गेममध्येही सिंधूचा दबदबा कायम राहिला. ओकुराहा प्रचंड तणावाखाली जाणवली. त्याच्याच फायदा उचलत सिंधूनं संपूर्ण कोर्टवर ओकुहाराला नाचवले. सिंधूने अवघ्या सहा मिनिटांत 7-2 अशी आघाडी घेत ओकुहारावरील दडपण आणखी वाढवले. ही आघाडी तिनं 11-4 अशी वाढवत जेतेपदाच्या दिशेनं मोठी झेप घेतली. सिंधूने प्रचंड आत्मविश्वासानं खेळ करताना ओकुहाराचा सहज पराभव केला. सिंधूनं हा सामना 21-7, 21-7 असा जिंकला. 

सामन्यानंतर सिंधू म्हणाली,'' या क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहत होती. हा विजय माझ्यासाठी खास आहे. आजच्याच दिवशी हा विजय मिळवल्यानं आनंद द्विगुणित झाला आहे. कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. ही तिला माझ्याकडून मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्तम भेट असेल.'' जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेते भारतीय
1983 - प्रकाश पादुकोण ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक
2011 - ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा ( महिला दुहेरी) - कांस्यपदक
2013 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक
2014 -   पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक
2015 - सायना नेहवाल ( महिला एकेरी) - रौप्यपदक
2017 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक
2017- सायना नेहवाल ( महिला एकेरी) - कांस्यपदक
2018 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक
2019 - बी साई प्रणित ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक
2019 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - सुवर्णपदक

Web Title: BWF World C’ship 2019 final : perfect birthday gift for mom, say world champion PV Sindhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.