आपल्या चमकदार लुकमुळे जगभरात चर्चेत आलेली शाओमीची SU7 या सेदान कारची ऑटोनॉमस ड्रायव्हिंग सिस्टिम फेल झाल्याचे वृत्त आहे. यामुळे या कारचा भीषण अपघात झाला असून यात बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शाओमीने ही कार गेल्या वर्षीच लाँच केली होती, आतापर्यंतचा हा या कारचा सर्वात भीषण अपघात आहे.
अपघातावेळी ही SU7 कार ऑटोपायलट मोडवर होती. तसेच ताशी ११६ किमी एवढा वेग होता. ड्रायव्हरला समोर अडथळा दिसला तेव्हा त्याने ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. ब्रेक दाबला तरी देखील कार ९७ किमीच्या वेगाने समोरच्या खांबावर जाऊन आदळली. या कारमध्ये अडास आहे, तरीही कारने खांब डिटेक्ट केला नाही. याहून कहर म्हणजे कारला आग लागली, तेव्हा आतील प्रवाशांनी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, परंतू दरवाजेच उघडले नाहीत. यामुळे तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
एकंदरीतच या अपघातानंतर या हायफाय कारच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. Xiaomi चे संस्थापक लेई जून यांनी अपघातावर खेद व्यक्त केला आहे. तसेच कंपनी चिनी यंत्रणांना तपासात सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. मी मागे राहणार नाही. शाओमी आपली जबाबदारी टाळणार नाही आणि पीडितांना भरपाई देईल, असेही ते म्हणाले.
कारमधील सिस्टिम फेल झाली...
या कारमध्ये कोलिजन वॉर्निंग आणि इमर्जन्सी ब्रेकिंग होते, असे कंपनीने म्हटले आहे. सध्या ही प्रणाली कोन, दगड किंवा प्राणी यांसारखे लहान अडथळे अचूकपणे ओळखू शकत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. शाओमीच्या कारच्या अपघातामुळे गुंतवणूकदारांमध्येही खळबळ उडाली आहे. गुंतवणूकदारांनीही यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, ज्यामुळे शाओमीचे शेअर्स ५.५ टक्क्यांनी घसरले आहेत.