ओला समस्यांची कात टाकणार...! S1 Pro Gen 3 स्कूटर उद्या लाँच करणार; अख्खे स्ट्रक्चरच बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:07 IST2025-01-30T14:06:20+5:302025-01-30T14:07:32+5:30
Ola S1 Pro Gen3: ओलाच्या तीन मोटरसायकलही येत आहेत. या जानेवारीत ओला रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी सुरु करणार होती. परंतू ती काही त्यांना शक्य झालेली नाही.

ओला समस्यांची कात टाकणार...! S1 Pro Gen 3 स्कूटर उद्या लाँच करणार; अख्खे स्ट्रक्चरच बदलले
मोठ्या धुमधडाक्यात लाँच झालेली ओला एस १ प्रो ही इलेक्ट्रीक स्कूटर तिच्यातील समस्यांनी देखील तेवढीच गाजली आहे. ओलाच्या सर्व्हिस सेंटरबाहेर हजारो स्कूटर धूळ खात पडलेल्या आहेत. आजही ही परिस्थिती बदललेली नाही. जेन १ झाली, जेन २ झाली तरी काही ओलाला समस्या कमी करता आल्या नव्हत्या. आता तिसऱ्या पिढीतील ओला स्कूटरचे इंजिनिअरिंगच बदलून टाकण्यात आले आहे. यामुळे या स्कूटरमध्ये कमी समस्या येतील असे गृहीत धरून ओला उद्या म्हणजेच ३१ जानेवारीला स्कूटर लाँच करत आहे.
ओलाच्या तीन मोटरसायकलही येत आहेत. या जानेवारीत ओला रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी सुरु करणार होती. परंतू ती काही त्यांना शक्य झालेली नाही. डिसेंबरमध्ये विक्रीही घसरलेली आहे. यामुळे ओलाच्या हेडऑफिसमधून त्यांच्या वेबसाईट, अॅपला भेट देणाऱ्यांना सारखे फोन जात आहेत. तिथून रोडस्टर लवकरच डिलिव्हरीसाठी उपलब्ध केली जाईल असे सांगितले जात आहे. परंतू तारीख काही हे लोक सांगत नाहीत, अशी स्थिती आहे.
अशातच ओलाने ओला एस १ च्या इंजिनिअरिंगमध्ये खूप मोठे बदल केले आहेत. यामध्ये मॅग्नेट नसलेली मोटर देण्यात आली आहे. यामुळे स्कूटर जास्त टॉर्क देणार आहे. यामुळे परफॉर्मन्स वाढणार आहे, असा ओलाचा दावा आहे. बॅटरीमध्ये ओलाने बनविलेला 4680 हा सेल वापरण्यात येणार आहे. यामुळे बॅटरीचे उर्जा साठविण्याची क्षमता १० टक्क्यांनी वाढणार आहे.
सेन्सर आणि वायरिंग कमी करण्यात आले आहे. बॅटरी पॅकला जोडूनच मोटर आणि ईसीयू देण्यात आला आहे. मल्टी-कोर प्रोसेसर वापरण्यात येत आहे. यामुळे या स्कूटरला अडासही मिळण्याची शक्यता आहे. ही स्कूटर MoveOS 5 वर आधारित असणार आहे. एकंदरीत कॉस्मेटीक बदल फार नसले तरी अंतर्गत बदल बरेच करण्यात आले आहेत. स्कूटरची फ्रेमही आता स्टील ऐवजी अॅल्युमिनिअमची करण्यात आली आहे. यामुळे स्कूटरचे वजन कमी झाले असून तिचा प्लॅटफॉर्म ओलाच्या एकापेक्षा अनेक वेगवेगळ्या मॉडेलच्या स्कूटर बनविण्यासाठी वापरला जाणार आहे.