निस्सान भारत सोडणार? अफवांच्या हिंदोळ्यावर निस्सानने मॅग्नाईट सीएनजी लाँच केली...
By हेमंत बावकर | Updated: May 28, 2025 15:00 IST2025-05-28T14:59:57+5:302025-05-28T15:00:19+5:30
Nissan Exit Update news: बराच काळ झाला पोर्टफोलिओमध्ये काही अपडेट नाही, आर्थिक संकट आणि भारतातील स्वत:चा उत्पादन प्रकल्प रेनॉल्टला देऊन टाकल्यावरून भारतीयांनी मनाशी जवळपास निस्सान भारत सोडून जाणार हे पक्के केले आहे. यावर निस्सानच्या गोटात आता हालचाली दिसू लागल्या आहेत.

निस्सान भारत सोडणार? अफवांच्या हिंदोळ्यावर निस्सानने मॅग्नाईट सीएनजी लाँच केली...
- हेमंत बावकर
जपानची कार कंपनी निस्सान भारत सोडणार अशा अफवा भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सुरु झाल्या आहेत. बराच काळ झाला पोर्टफोलिओमध्ये काही अपडेट नाही, आर्थिक संकट आणि भारतातील स्वत:चा उत्पादन प्रकल्प रेनॉल्टला देऊन टाकल्यावरून भारतीयांनी मनाशी जवळपास निस्सान भारत सोडून जाणार हे पक्के केले आहे. यावर निस्सानच्या गोटात आता हालचाली दिसू लागल्या आहेत. आम्ही भारत सोडणार नाही, असे आश्वासन देतानाच निस्सानने सीएनजी कार लाँच केली आहे.
निस्सानची मॅग्नाईट ही बोल्ड लुकवाली कार सीएनजी पर्यायात मिळणार असून हे सीएनजी किट कंपनी फिटेड नाही तर रेट्रो फिटेड असणार आहे. डीलर स्तरावर कंपनी हे सीएनजी किट लावून देणार आहे. सरकारी मान्यताप्राप्त कंपन्यांचे हे सीएनजी किट असणार आहे. यामुळे कारच्या किंमतीत वाढ होणार आहे. CNG व्हेरिएंटची किंमत ₹६.८९ लाख असणार आहे.
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी आज निस्सान एक्झिटवरील शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. निस्सान भारतातून आपला व्यवसाय बंद करत असल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. या सर्व अफवा आहेत. आम्ही भारत सोडणार नाही असे ते म्हणाले आहेत. वाहनांचा पोर्टफोलिओ वाढविणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआरमध्ये ही सीएनजी कार पहिल्या टप्प्यात उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. मायलेज किती देईल याबाबत वत्स यांनी काहीही सांगितलेले नाही. परंतू, या वाहनाची वॉरंटी तीन वर्षे किंवा एक लाख किलोमीटर असेल असे ते म्हणाले.
विश्वास कसा जिंकणार...
भारतीय ग्राहकांच्या मनात निस्सान सोडून जाण्याबाबत किंतू परंतू आहे. अलीकडच्या काळात फोर्ड कंपनी भारत सोडून गेली आहे. फोर्डची सर्व्हिस सेंटर आजही सुरु आहेत. फोर्ड भारतात रिलाँच झाली होती. ९० च्या दशकात भारतीयांच्या मनात जी अढी बसली त्यातून पुढील २५ वर्षे फोर्ड काही केल्या बाहेर येऊ शकली नाही. तसेच निस्सानबाबतही बोलले जात आहे. त्यात निस्सानसारख्याच कार बनविणारी रेनो ही त्यांची सहकंपनी भारतात उपस्थित आहे. यावर वत्स यांनी आम्ही फक्त आमची फॅक्टरी रेनोकडे हस्तांतरीत केली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी आम्ही देखील रेनोच्या कार बनवत होतो. आता ते आमच्यासाठी बनविणार आहेत. या प्रकल्पाची ५ लाख युनिटची कॅपॅसिटी आहे. पुढील दोन वर्षांत आम्ही भारतात १ लाख कार विक्री करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. तर निर्यातीसाठी १ लाख असे दोन लाख कार उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले आहे, असे ते म्हणाले.
सध्या निस्सानचे १६० शोरुम, १२५ सर्व्हिस सेंटर आहेत. ते नवीन कार आल्या की १८० पर्यंत नेण्यात येईल. अनेक छोट्या शहरांत आम्ही नाही, नवीन गाड्यांच्या लाँचसोबत हे नेटवर्क वाढविले जाणार असल्याचे ते म्हणाले.