इंग्रजही भारताला फॉलो करतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 09:28 IST2019-03-05T09:24:35+5:302019-03-05T09:28:24+5:30
ब्रिटनमधील रस्त्यांवर आता थ्री डी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात आले आहेत.

इंग्रजही भारताला फॉलो करतात तेव्हा...
वाहतूक कोंडी, नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण शिस्तप्रिय असलेल्या ब्रिटनलाही भेडसावत असतात. यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत. ब्रिटनमधील रस्त्यांवर आता थ्री डी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात आले आहेत.
वेगात जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी करण्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था सुरक्षित बनविण्यासाठी हा प्रायोगिक तत्वावर प्रयोग करण्यात आला आहे.
ब्रिटनमधील सेंट जॉन्स वूड हाय स्ट्रीटवर 1 मार्चपासून हे थ्री डी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावर काहीतरी चौकोनी ठोकळ्यासारखे तरंगत असल्याचा भास होत असून गाड्यांचा वेग कमी होत आहे. मात्र, जवळ आल्यावर खरे दिसत असल्याने वाहनचालकांच्या चेहऱ्यावरही हसू येत आहे.
या प्रयोगाची सुरुवात ब्रिटनमधील उत्तर-पश्चिमी भागात करण्यात आली आहे. हा भाग असा आहे जेथे शाळकरी मुलांसमवेत स्थानिक लोकही मोठ्या प्रमाणात ये-जा करतात.
साधारण वर्षभर हा प्रयोग केला जाणार आहे. याची सफलता पाहून पुढे अन्य भागांमध्ये थ्री डी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवण्यात येणार आहेत.
महत्वाचे म्हणजे यापूर्वी भारत आणि आईसलँडमध्येच थ्री डी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवण्यात आले होते.
दिल्लीमध्ये वाहनांचा वेग मंदावलेला
ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर सिटी काऊंसिलने या प्रयोगाची सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये जेव्हा याची सुरुवात केली गेली तेव्हा तेथील वाहनांचा वेग 50 वरून 30 किमीवर आला होता.
काय प्रकार आहे हा...
झेब्रा क्रॉसिंगला थ्री डी आकृतीमध्ये रंगविण्यात येते. यामुळे रस्त्यावर काहीतरी उभे असल्याचा भास होतो व चालकाचा पाय आपोआपच ब्रेकवर वळतो.