व्हिएतनामी इलेक्ट्रिक कार उत्पादन कंपनी विनफास्ट भारतात आपले कामकाज सुरू करण्यास सज्ज आहे. कंपनी ३१ जुलै २०२५ रोजी प्लांटचे उद्घाटन करण्यास सज्ज आहे. विनफास्ट भारतात तमिळनाडूतील थुथुकुडी येथे आपला उत्पादन प्रकल्प सुरू करत आहे. या प्रकल्पात, पुढील महिन्यात लाँच होणाऱ्या व्हीएफ ६ आणि व्हीएफ ७ इलेक्ट्रिक एसयूव्हीचे स्थानिक पातळीवर उत्पादन केले जाईल.
ही कंपनी या प्रकल्पात ५ वर्षांच्या कालावधीत ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १,५०,००० युनिट्स एवढी आहे.
विनफास्टने एप्रिल २०२४ मध्ये या नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. तो आता लवकरच तयार होत आहे. हा प्रकल्प तामिळनाडू इंडस्ट्रियल प्रमोशन कॉर्पोरेशन (SIPCOT) इंडस्ट्रियल पार्कमध्ये असलेल्या ४०० एकर एढ्या जागेत पसरलेला आहे. यातून ३,००० ते ३,५०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होणे अपेक्षित आहे.
कंपनीने अलीकडेच थुथुकुडी प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर २०० व्यावसायिकांच्या पहिल्या गटाला सामील केले आहे. तत्पूर्वी कंपनीने जाहीर केले होते की, हा नवीन प्लांट केवळ देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी पूर्ण करणार नाही तर दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका अशा अनेक परदेशी बाजारपेठांमध्ये उत्पादनाचे निर्यात करेल. २७ शहरांमध्ये ३२ डीलरशिपसह ऑपरेशन्स सुरू -महत्वाचे म्हणजे, विनफास्टने आपले नेटवर्क वाढवायलाही सुरुवात केली आहे. देशभरातील २७ शहरांमध्ये ३२ डीलरशिपसह ऑपरेशन्स सुरूही करण्यात आले आहे. ब्रँडने भारतात विनफास्ट व्हीएफ ६ आणि व्हीएफ ७ साठी २१,००० रुपयांच्या टोकनवर प्री-बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात देखील केली आहे.