कार घेताय? मग जरा थांबा...या वर्षी येताहेत ८१ नवी माॅडेल्स; ई-वाहनांचीही पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:29 IST2023-05-06T12:29:04+5:302023-05-06T12:29:10+5:30
आधुनिक तंत्रज्ञानासह मिळणार अनेक सुविधा

कार घेताय? मग जरा थांबा...या वर्षी येताहेत ८१ नवी माॅडेल्स; ई-वाहनांचीही पर्वणी
नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षी वाहन विक्रीचा सुसाट वेग हाेता. आता नव्या आर्थिक वर्षासाठी कार कंपन्यांनी आक्रमक तयारी केली आहे. वर्षभरात तब्बल ८१ नवे माॅडेल्स लाॅंच करण्यात येणार आहेत. त्यात ४७ टक्के वाटा लक्झरी कारचा राहणार असून ई-वाहनांचाही समावेश आहे.
वाहन विक्रेत्यांची संघटना ‘फाडा’च्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात एकूण ३६.२० लाख कार विक्री झाली हाेती. हा आकडा २०२१-२२ च्या तुलनेत २३ टक्क्यांनी जास्त आहे. जेटाे डायनामिक्स या ऑटाे इंटेलिजन्स फर्मच्या अहवालानुसार, नव्या माॅडेल्सपैकी ६६ टक्के कार्स नव्या प्लॅटफाॅर्मवर बनविण्यात येणार आहेत. बदलते नियम, नवे तंत्रज्ञान, इंधनाचे बदलते स्वरूप इत्यादींचा परिणाम नव्या वाहनांमध्ये दिसणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नव्या माॅडेल्ससाठी आक्रमक पवित्रा कशामुळे?
ग्राहकांच्या आवडी बदलत आहेत. त्यामुळे नव्या रचनेवर भर देण्यात येत आहे. काॅम्पॅक्ट एसयूव्ही आणि एसयूव्हीला गेल्या वर्षी प्रचंड मागणी दिसून आली. त्यामुळे कंपन्या याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. येणाऱ्या काळात ई-वाहनांकडे कल राहणार आहे. ग्राहकही ई-वाहनांची खरेदी करू लागले आहेत. त्यासाेबतच हायब्रीड तंत्रज्ञानालाही मागणी आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानावर कंपन्या भर देत आहेत. किमती जास्त असल्या तरीही हायब्रीड गाड्या विकल्या जातात. देशभरात वाहन प्रदूषणाशी संबंधित बीएस६-II नियम लागू झाले आहेत. त्यामुळे इंजिनमध्ये बदल करावे लागणार आहेत.
रेंज आणि स्मार्टनेस वाढणार
नव्या ई-कार्समध्ये बदललेले तंत्रज्ञान तसेच जास्त रेंज मिळेल. सध्या २५० किलाेमीटरपासून रेंज सुरू हाेते. नव्या गाड्यांमध्ये रेंज किमान ३५० किमी एवढी राहील. पेट्राेल गाड्यांचाही स्मार्टनेस वाढणार आहे. मायलेज वाढविण्यासाठी कंपन्या कारचे वजन कमी करण्याचाही विचार करीत आहेत.