दुचाकी दरवाढीची गती सुसाट; २ वर्षांत ३० ते ४० टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 08:36 AM2021-10-21T08:36:39+5:302021-10-21T08:37:03+5:30

बरेचजण प्रसंगी अर्धवेळ नोकरी करून स्वप्नपूर्ती करतात; पण आता दुचाकीच्या दरवाढीची गती इतकी वेगवान झाली आहे की, तिच्याशी स्पर्धा करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

pace of two wheeler price hike 30 to 40 percent increase in 2 years | दुचाकी दरवाढीची गती सुसाट; २ वर्षांत ३० ते ४० टक्क्यांची वाढ

दुचाकी दरवाढीची गती सुसाट; २ वर्षांत ३० ते ४० टक्क्यांची वाढ

Next

- सुहास शेलार

मुंबई : वयाची विशी ओलांडली की प्रत्येक तरुणाला दुचाकीचे वेध लागतात. जास्त महागडी नसली तरी किमान १५० सी.सी.ची (घन क्षमता) बाईक आपल्याकडे असावी असे त्यांचे स्वप्न असते. बरेचजण प्रसंगी अर्धवेळ नोकरी करून स्वप्नपूर्ती करतात; पण आता दुचाकीच्या दरवाढीची गती इतकी वेगवान झाली आहे की, तिच्याशी स्पर्धा करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

२०१९ पासून दरवाढीचे सत्र सुरू आहे. कोरोनाने त्यात अतिरिक्त भर घातली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहर्ष दमानी यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांत दुचाकीचे दर जवळपास ४० टक्क्यांनी वधारले आहेत. धातूंच्या वाढलेल्या किमती त्यास मुख्यत्वे जबाबदार आहेत. कोरोनाकाळात उत्पादन आणि विक्रीवर परिणाम झाल्याने त्याचे पडसादही दरवाढीच्या आलेखावर उमटत आहेत.

कोरोनाकाळात खाणकाम करणारा मजूर वर्ग गावी स्थलांतरित झाल्याने खनिकर्म उद्योग बंद ठेवावा लागला. धातूच्या वस्तू महागल्या. दुचाकीच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने लोखंड, स्टील आणि अन्य धातूंपासून बनविलेल्या उपकरणांचा वापर केला जातो. उत्पादन खर्च वाढल्याने किमती वाढवाव्या लागल्या. ‘’सेमीकंडक्टर चिप’’ प्रक्रियेमुळे निर्मिती कालावधी वाढला आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकी बाजारात येण्यासाठी दोन महिन्यांचा विलंब होत आहे. त्यातुलनेत बुकिंग अधिक असल्याने त्याचा परिणामही दरवाढीवर होताना दिसत असल्याचे पॅलेडियम ऑटोमोटिव्हचे संचालक मयूर जैन यांनी सांगितले.

आयातीवर परिणाम
भारतात उत्पादित होणाऱ्या दुचाकींसाठीचे निम्म्याहून अधिक स्पेअर पार्ट चीनमधून आयात केले जातात. कोरोनाने आयातीवर परिणाम केल्याने उत्पादन साहित्य पोहोचण्यास विलंब होत आहे. स्पेअर पार्टच्या किमतीही वाढल्या आहेत. निर्मितीपासून विक्रीपर्यंत सर्व घटक महागल्याने दरवाढ करावी लागली. हे अवलंबित्व संपत नाही तोवर महागाईचा आलेख चढाच राहील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सप्टेंबरमधील दुचाकी विक्री
२०१९                २०२०             २०२१
११,६४,१३५    १०,३३,८९५    ९,१४,६२१

सर्वसाधारण किंमत (करांसहित)
प्रकार         दोन वर्षांपूर्वी    आता
१०० सीसी    ६५,०००        ८०,०००
१२५ सीसी    ७०,०००       ९०,०००
१५० सीसी    ८५,०००      १,२०,०००
२०० सीसी    १,००,०००    १,५०,०००
२२० सीसी    १,००,०००    १,६०,०००

Web Title: pace of two wheeler price hike 30 to 40 percent increase in 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app