झेपते तेवढेच करणार...! आता नवी कोरी कारही डिलिव्हर करणार झेप्टो; या कंपनीसोबत झाली डील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:31 IST2025-02-05T13:30:57+5:302025-02-05T13:31:27+5:30
Zepto Car Delivery: ई कॉमर्सचे दिवस आता संपत आले आहेत. आता क्विक-कॉमर्स कंपन्यांचे दिवस सुरु झाले आहेत.

झेपते तेवढेच करणार...! आता नवी कोरी कारही डिलिव्हर करणार झेप्टो; या कंपनीसोबत झाली डील
ई कॉमर्सचे दिवस आता संपत आले आहेत. आता क्विक-कॉमर्स कंपन्यांचे दिवस सुरु झाले आहेत. ग्राहकांना आता कुठेही जायची गरज नसून एका एपवर मागणी केली की ती काही मिनिटांत तुमच्या दारात ती वस्तू आणून पोहोच केली जाते. झेप्टो, ब्लिंक ईट सारख्या कंपन्या यासाठी कामाला लागल्या आहेत. यामुळे लोकांना रोजगारही उपलब्ध झाले आहेत. असे असताना आता झेप्टोने नवी कोरी कारही डिलिव्हर करण्यास सुरुवात केली आहे.
झेप्टो सध्या शहरांमध्ये ग्रॉसरी, ईलेक्ट्रॉनिक वस्तूंसह कपडे आदी गोष्टी डिलिव्हर करत आहे. iPhone 16 लाँच झालेला तेव्हाही झेप्टोने तो काही मिनिटांत डिलिव्हर करण्यास सुरुवात केली होती. इथपर्यंत ठीक होते, पण या कंपनीने आता थेट कारच डिलिव्हर करण्याचा प्लॅन आखला आहे.
यासाठी झेप्टोने स्कोडासोबत हात मिळविला आहे. स्कोडाची नुकतीच लाँच झालेली स्कोडा कायलॅक ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार झेप्टो त्याच्या ग्राहकांना डिलिव्हर करणार आहे. कंपनीकडून याचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे. परंतू ही प्रोसेस १० मिनिटांची असणार की त्यासाठी आपण जसे शोरुमला जाऊन बुकिंग करतो तसे सात- आठ दिवसांची असणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
झेप्टो आणि स्कोडा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असे दाखविण्यात आले आहे की झेप्टोच्या डिलिव्हरी एजंटला त्याला कार डिलिव्हरी करायला जायचे आहे हेच माहिती नाहीय. ही डिलिव्हरी कारची आहे याबाबत तो अनभिज्ञ आहे. झेप्टोने नुकतीच ही सेवा सुरू केली आहे, असे यातून दाखविण्यात आले आहे.
हा डिलिव्हरी बॉय स्कोडाची कार एका फ्लॅटबेड ट्रकवर सुरक्षितरित्या बांधून नेताना दाखविण्यात आला आहे. झेप्टो युजर्स स्कोडा कारसाठी ऑर्डर करू शकणार आहेत. कायलॅकशिवाय स्कोडाच्या अन्य कारही झेप्टो अॅपवरून ऑर्डर करता येणार आहेत. आता इन्शुरन्स, लोन आदी प्रक्रिया ओलाच्या स्कूटर बुकिंगसारखीच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.