नितीन गडकरींची मोठी घोषणा; 1 जानेवारीपासून सर्वच वाहनांना फास्टॅग बंधनकारक, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 19:42 IST2020-12-24T19:41:23+5:302020-12-24T19:42:10+5:30
Fastag News: देशात गेल्या वर्षभरापासून ‘फास्टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला काही राष्ट्रीय महामार्गांवर टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्वावर ‘फास्टॅग’ वापर सुरू झाला.

नितीन गडकरींची मोठी घोषणा; 1 जानेवारीपासून सर्वच वाहनांना फास्टॅग बंधनकारक, अन्यथा...
नवी दिल्ली : देशभरातील टोल नाक्यांवर वेळ वाचविण्यासाठी फास्टॅग प्रणाली वर्षभरापूर्वीपासून बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, एकाचवेळी एवढे फास्टॅग मिळविणे आणि त्या प्रणालीतील दोष पाहून सरकारने ही मुदत काहीवेळा वाढविली होती. आता १ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याची माहिती दिली. देशातील सर्व टोल नाक्यांवर 1 जानेवारी, 2021 पासून FASTag बंधनकारक करण्यात आले आहेत. चारचाकींपासून पुढे सर्वचत वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. यामुळे वाहनचालकांना टोलनाक्यावर न थांबता पुढे जाता येणार आहे. तसेच पैसे देण्याच्या वेळासोबतच इंधनाचा खर्चही वाचणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
देशात गेल्या वर्षभरापासून ‘फास्टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला काही राष्ट्रीय महामार्गांवर टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्वावर ‘फास्टॅग’ वापर सुरू झाला. आता १ जानेवारीपासून सर्व टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’द्वारेच टोल वसुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पण, प्रत्यक्षात सहा वर्षानंतर अनेक वाहनांवर ‘फास्टॅग’ नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ‘फास्टॅग’ टोल वसुलीसाठी एक ते दोन लेन वगळता सर्व लेन राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण अनेक वाहनांना ‘फास्टॅग’ नसल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. त्यामुळे हे बंधन शिथील करण्यात आले. आता नवीन वर्षापासून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
देशात ‘फास्ट टॅग’ला वाढता प्रतिसाद
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार, देशातील ‘फास्ट टॅग’ असलेल्या वाहनांचा आकडा २ कोटींपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दररोजची एकूण टोलवसुली ९२ कोटींवर पोहचली आहे. मागील वर्षी हा आकडा सुमारे ७० कोटी एवढा होता. एकूण टोलवसुलीत ७५ टक्के वसुली ‘फास्टॅग’द्वारे होत आहे.
१० हजार वाहनांना ‘फास्टॅग’
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘फास्ट टॅग’ला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर दररोज सुमारे ५० ते ५५ हजार वाहने ये-जा करतात.
त्यापैकी सुमारे ३५ हजार कार आणि अन्य हलकी वाहने आहेत. त्यापैकी केवळ १० हजार वाहनांनाच ‘फास्टॅग’ असल्याचे विवेक देवस्थळी यांनी सांगितले.
१ जानेवारीपासून सर्व लेन ‘फास्टॅग’साठी राखीव झाल्यास, दुप्पट टोल वसुली करण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचेही त्यांनी सांगितले.