१ एप्रिलच्या पूर्वसंध्येला मोठी डील झाली; निस्सान इंडिया या कंपनीच्या मालकीची झाली, आता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:56 IST2025-04-01T16:55:52+5:302025-04-01T16:56:05+5:30
Nissan india Renault Deal: होंडासोबतच्या डीलमधून बाहेर पडलेली निस्सान कंपनी आता वेगवेगळे पर्याय शोधू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतातील कंपनी निस्सानने त्यांची गुंतवणूकदार कंपनी रेनॉच्या ताब्यात दिली आहे.

१ एप्रिलच्या पूर्वसंध्येला मोठी डील झाली; निस्सान इंडिया या कंपनीच्या मालकीची झाली, आता...
होंडासोबतच्या डीलमधून बाहेर पडलेली निस्सान कंपनी आता वेगवेगळे पर्याय शोधू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतातील कंपनी निस्सानने त्यांची गुंतवणूकदार कंपनी रेनॉच्या ताब्यात दिली आहे. ३१ मार्चला एक मोठी डील झाली असून रेनॉने निस्सान इंडियामध्ये ५१ टक्के भागीदारी मिळविली आहे. म्हणजेच निस्सान इंडिया आता रेनॉच्या मालकीची झाली आहे.
भारतात निस्सान आणि रेनॉ आता जॉईंट व्हेंचरद्वारे काम करणार आहेत, या कंपनीचे नाव रेनॉ निस्सान ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे ठेवण्यात आले आहे. रेनॉ ग्रुपकडे आता रेनॉल्ट निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (RNAIPL) चे 100 टक्के मालकी हक्क असतील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. हा व्यवहार कितीला झाला ते अद्याप समजू शकलेले नाही.
गेल्या काही काळापासून निस्सान भारत सोडून जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. परंतू, आताही निस्सान भारत सोडून जाणार नाहीय. रेनॉकडे मालकी असली तरी करारानुसार निस्सान मॅग्नाईटसह आपल्या कार भारतात बनविणार आणि विकणार आहे. तसेच निर्यातही करणार आहे. रेनॉल्ट निसान टेक्नॉलॉजी अँड बिझनेस सेंटर इंडियामध्ये निस्सानकडे ४९ टक्के हिस्सा राहणार आहे.
२०२६ पासून रेनॉ निस्सानसाठी ईव्ही कार बनविणार आहे. निस्सान एक स्वतंत्र कंपनी राहणार असून आपला विस्तार करणार आहे. तसेच रेऩॉला आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तार करण्यास मदत मिळणार आहे, असे या कंपन्यांनी सांगितले आहे.
निस्सानने एकट्या मॅग्नाईटच्या जिवावर जवळपास ९९ हजारांहून अधिक कार सरत्या आर्थिक वर्षात विकल्या आहेत. आणखी दोन कार आणणार असल्याचे कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे. यानंतर एक ईव्ही कारदेखील असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.