Nissan Datsun India Exit: फोर्डनंतर आणखी एक कंपनी भारत सोडून चालली; एक ब्रँडच केला बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:19 IST2022-04-21T18:19:36+5:302022-04-21T18:19:56+5:30
निस्सान आता भारतातून गाशा गुंडाळणार अशा चर्चा सुरु झालेल्या असतानाच या कंपनीला मॅग्नाईटने संजिवनी दिली.

Nissan Datsun India Exit: फोर्डनंतर आणखी एक कंपनी भारत सोडून चालली; एक ब्रँडच केला बंद
निस्सान मोटर्स इंडियाने भारतात आल्यापासून पाय रोवण्याचा प्रयत्न केला. यासाठी एका मागोमाग एक असे ब्रँडही आणले परंतू काहीच चालले नाही म्हणून अखेर गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. निस्सानने डॅटदस या ब्रँडच्या कारची निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई येथील प्रकल्पात redi-Go (रेडी-गो) चे उत्पादन बंद केल्याचे कंपनीने म्हटले आहे. डॅटसन हा ब्रँड जगभरात अखेरच्या घटका मोजत असून तो आता फार मोजक्या देशांमध्ये राहिला आहे. भारतात येताच निस्सानने डॅटसन ब्रँड आणला होता. या ब्रँडच्या गो+, गो आणि रेडी गो अशा पाच ते सात सीटर कार रस्त्यावर उतरविल्या होत्या. सुरुवातीला काहींनी या ब्रँडमध्ये रस दाखविला. परंतू, नंतर अनेकांनी त्याकडे पाठ फिरविली आणि कंपनी फसली. यानंतर ही कंपनी पुन्हा काही उभी राहू शकली नाही.
निस्सान आता भारतातून गाशा गुंडाळणार अशा चर्चा सुरु झालेल्या असतानाच या कंपनीला मॅग्नाईटने संजिवनी दिली. परंतू डॅटसनला मात्र कोणतीच कार सापडली नाही. लोकांना स्वस्त आणि मस्त ऑफर देऊनही कंपनीना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर डॅटसनला गाशा गुंडाळावा लागला आहे. आता निसानच्या म्हणण्यानुसार रेडी गोची विक्री सुरु राहिल आणि डॅटसनच्या ग्राहकांना आधीसारखीचे सेवा दिली जाईल.
निस्सानने सब कॉम्पॅक्ट एसयुव्हीसाठी डॅटसन बंद केल्याचे सांगितले जात आहे. २०२० मध्ये ही कार लाँच केली होती. ही चालली नसती तर निस्सानला देखील काढता पाय घ्यावा लागला असता. परंतू या कारला मोठी पसंती मिळाली आणि निस्सानच्या भारतीय बाजारात आशा पल्लवीत झाल्या आहेत. आकर्षक लूक आणि कमी किंमत यामुळे ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली होती. परंतू पुन्हा या कारची विक्री मंदावल्याचे दिसत आहे. यामुळे निस्सानला या कारकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे.