भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:46 IST2025-12-17T14:45:57+5:302025-12-17T14:46:11+5:30
निसान उद्या भारतात आपली नवीन फॅमिली कार सादर करणार आहे. रेनॉल्ट ट्रायबरवर आधारित या कारमध्ये काय असेल खास? वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशनबद्दल सर्वकाही.

भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
भारतीय वाहन बाजारात गेल्या काही वर्षांपासून एकाच कारवर तग धरून असणारी निस्सान ही जपानी कंपनी आता दुसरी कार लाँच करणार आहे. निस्सान उद्या सात सीटर एमपीव्ही जागतिक बाजारपेठेत सादर करणार आहे. मॅन्गाईटनंतर भारतात निस्सानची ही उपलब्ध होणारी दुसरी कार असणार आहे.
रेनॉल्ट आणि निस्सान यांच्या एकसारख्याच परंतू दिसायला वेगळ्या असलेल्या कार या काही लपून राहिलेल्या नाहीत. यामुळे ही कार देखील रेनॉल्टच्या ट्रायबरच्या प्लॅटफॉर्मवर बनविलेली असणार आहे. निस्सानने या कारच्या डिझाईनमध्ये मोठा बदल केलेला असणार आहे. निसानची सिग्नेचर 'V-Motion' ग्रिल आणि आक्रमक डिझाइनमुळे ही कार दिसायला प्रीमियम वाटणार आहे.
ट्रायबरप्रमाणेच या कारमध्ये देखील टर्बो इंजिन मिळणार नाहीय. यामध्ये १.० लिटर, ३-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (७२ PS पॉवर आणि ९६ Nm टॉर्क) असणार आहे. तसेच ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी (AMT) गिअरबॉक्सचा पर्याय दिला जाणार आहे. आतमध्ये ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो असणार आहे.
सुरक्षेसाठी टॉप व्हेरियंटमध्ये ६ एअरबॅग्स, ईएससी , हिल होल्ड असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आदी दिली जाण्याची शक्यता आहे. निसान ही कार अत्यंत स्पर्धात्मक किमतीत लाँच करण्याची चिन्हे आहेत. तज्ज्ञांच्या मते, या कारची सुरुवातीची किंमत ६ लाख ते ९ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. यामुळे ही भारतातील सर्वात स्वस्त ७-सीटर फॅमिली कारपैकी ठरणार आहे.