टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:17 IST2025-09-17T16:17:15+5:302025-09-17T16:17:43+5:30
Tesla model Y: यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने टेस्लाच्या २०२१ पासून विकल्या गेलेल्या १७४,००० कारची तपासणी सुरु केल्याचे जाहीर केले आहे.

टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
टेस्ला कंपनीने भारतात लाँच केलेल्या मॉडेल वाय या ६० लाखांच्या ईलेक्ट्रीक कारबाबत एक मोठी धक्कादायक बातमी येत आहे. अमेरिकेतील लोक काचा फोडून बाहेर येत आहेत. यामुळे यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने टेस्लाच्या २०२१ पासून विकल्या गेलेल्या १७४,००० कारची तपासणी सुरु केल्याचे जाहीर केले आहे.
टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक डोअर हँडलमध्ये बिघाड होत आहे. यामुळे आतून आणि बाहेरून दरवाजे उघडता येत नाहीत. तसेच काचाही खाली-वर करता येत नाहीएत. यामुळे आतमध्ये अडकलेल्यांना काचा फोडून बाहेर यावे लागत आहे. हे प्रकार वाढल्याने टेस्लाची ही कार रडारवर आली आहे.
लहान मुलांना पाठीमागच्या सीटवर बसवून दरवाजा लावल्यानंतर अनेकांना आपला दरवाजा बाहेरून उघडता आलेला नाहीय. यामुळे या मुलांना टेस्लाच्या काचा फोडून बाहेर काढावे लागले आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले असून टेस्लाने अद्याप त्यांना यावर काही प्रतिक्रिया दिली नसल्याचे म्हटले आहे.
NHTSA ने म्हटले आहे की २०२१ टेस्ला मॉडेल Y वाहनांवर पालक दरवाजे उघडू शकले नाहीत असे नऊ प्रकरण समोर आले आहेत. टेस्लाची हीच कार भारतात लाँच झाली आहे. या कारची डिलिव्हरी देखील सुरु झाली आहे. भारतात असा प्रकार अद्याप समोर आलेला नाही. २०२१ च्या मॉडेलला ही समस्या आहे की त्यानंतरच्या देखील हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.