मुंबई : देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी मारुती सुझुकी 2020 पर्यंत त्यांच्या सर्वाधिक खपाच्या डिझेल इंजिनच्या कार बंद करण्याच्या तयारीत आहे. भारत स्टेज 6 उत्सर्जन नियमावली लागू होण्याचे कारण यामागे आहे. BS6 मध्ये डिझेल इंजिनांवर बंदी नसली तरीही कंपनी केवळ पेट्रोल इंजिनांच्या कार विकणार आहे.
2020 पासून देशात BS6 सुरु होणार आहे. याच्या तयारीला अनेक कंपन्या लागल्या असून काहींनी एकमेकांची इंजिने वापरण्यासाठी करारही केले आहेत. मात्र, देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी मारुतीने याची धास्ती घेतलेली आहे. महत्वाचे म्हणजे मारुतीने दोन वर्षांपूर्वीच स्व:ताची इंजिने बनविण्यासाठी मोठी गुंतवणूक केलेली आहे. आतापर्यंत मारुती फियाटची इंजिने आपल्या कारमध्ये वापरत होती.
BS6 नियमावलीमुळे अनेक कंपन्यांना या श्रेणीची इंजिने बनविण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागली आहे. मात्र, पेट्रोलच्या इंजिनापेक्षा डिझेलचे इंजिन जास्त प्रदूषण करत असल्याने या इंजिनाच्या विकासासाठी कंपन्यांना मोठा खर्च येत आहे. मारुतीलाही पेट्रोल इंजिनापेक्षा 2.5 लाख रुपये अधिकचा खर्च डिझेलच्या इंजिनावर येणार आहे. यामुळे स्विफ्ट, डिझायर आणि बलेनोची डिझेल मॉडेल कंपनी बंद करण्याच्या विचारात आहे. अन्यथा या गाड्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.