मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:12 IST2025-08-26T14:10:45+5:302025-08-26T14:12:41+5:30
Maruti Suzuki eVitara: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार अखेर भारतीय बाजारात लॉन्च केली.

मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार अखेर भारतीय बाजारात लॉन्च केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे उद्घाटन करण्यात आले. या कारच्या माध्यमातून मारुतीने अधिकृतपणे इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेत पाऊल ठेवले असून, ग्राहकांच्या अपेक्षा आणि उत्सुकता शिगेला पोहोचल्या आहेत.
या कार्यक्रमादरम्यान मोदींनी गुजरातमधील हंसलपूर येथील ईव्ही प्लांटमध्ये ई-विटाराच्या पहिल्या युनिटला हिरवा झेंडा दाखवला. या प्लांटमध्ये तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या जगभरातील १०० देशांमध्ये निर्यात केल्या जाणार आहेत, ज्यामध्ये युरोप, जपान आणि यूकेसारख्या प्रमुख बाजारांचा समावेश आहे. हे मॉडेल गेल्या वर्षी युरोपमध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्यात आले होते आणि २०२५ च्या ‘भारत मोबिलिटी शो’मध्येही ते दाखवण्यात आले होते.
ही गाडी लवकरच अधिकृतरित्या भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची अंदाजित एक्स-शोरूम किंमत सुमारे २० लाख रुपये असण्याची शक्यता आहे. मारुतीची ही ईव्ही कार प्रामुख्याने टाटा नेक्सॉन ईव्ही, महिंद्रा एक्सयूव्ही ४०० आणि एमजी कॉमेट ईव्ही यांसारख्या कारशी स्पर्धा करेल. दरम्यान, या कार संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मारुतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.