मारुती सुझुकी अल्टो, सेलेरिओ, एस-प्रेसो बंद करण्याची शक्यता; अध्यक्षांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:12 IST2022-06-28T18:12:19+5:302022-06-28T18:12:57+5:30
Maruti Suzuki Small Cars May Be Discontinued: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे लाखो लोकांना याचा फटका बसू शकतो.

मारुती सुझुकी अल्टो, सेलेरिओ, एस-प्रेसो बंद करण्याची शक्यता; अध्यक्षांनी दिले संकेत
मारुती सुझुकी सामान्यांना परवडणाऱ्या छोट्या कार भविष्यात कायमच्या बंद करण्याची शक्यता आहे. यामुळे एन्ट्री लेव्हलच्या अल्टो, सेलेरिओ, एस प्रेसो सारख्या कार बाजारातून डिसकंटीन्यू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी तसे संकेत दिले आहेत.
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे लाखो लोकांना याचा फटका बसू शकतो. केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ पासून सर्व पॅसेंजर कारना सहा एअरबॅग देणे बंधनकारक केले आहे. यावर मारुतीने आक्षेप नोंदविला आहे. हा नियम रद्द न केल्यास कंपनीला छोट्या कारचे उत्पादन बंद करावे लागेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सहा एअरबॅग बंधनकारक केल्या तर कारची किंमत वाढणार आहे. तसेही छोट्या कारमधून मारुतीला फायदा होत नाहीय. उत्पादन खर्च वाढल्याने कारच्या किंमती वाढतील आणि त्याचा परिणाम ग्राहकांवर देखील होईल, असे भार्गव यांनी म्हटले आहे. सरकारने या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरींनी सहा एअरबॅगसाठी कठोर भूमिका घेतलेली आहे. देशात जगाच्या एक टक्का देखील कार नाहीत, परंतू अपघातातून होणारे मृत्यू हे १० टक्के आहेत, असे ते म्हणाले होते. एक ऑक्टोबरपासून सर्व पॅसेंजर गाड्यांना सहा एअरबॅग बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा गडकरींनी केली होती. यामुळे लोकांचे प्राण वाचतील असेही ते म्हणाले होते. सध्या दोन एअरबॅग बंधनकार करण्यात आलेल्या आहेत. १ ऑक्टोबरपासून ज्या गाड्या उत्पादित होतील व ज्यांची सिटींग कॅपॅसिटी ही ८ सीट पर्यंत असेल त्यांना सहा एअरबॅग द्याव्या लागणार आहेत.