कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:54 IST2025-12-12T09:54:01+5:302025-12-12T09:54:29+5:30
Maruti Brezza Sales Down: एकेकाळी या सेगमेंटवर राज्य करणारी मारुती सुझुकी ब्रेझा आता विक्रीत पिछाडीवर पडली आहे, तर टाटा नेक्सॉनने आपला दबदबा वाढवत सलग तिसऱ्या महिन्यात सर्वाधिक विक्रीचा विक्रम केला आहे.

कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
मुंबई: नोव्हेंबर २०२५ च्या वाहन विक्रीच्या आकडेवारीनुसार, भारतीय ऑटो बाजारातील सब-फोर मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठे बदल दिसून आले आहेत. एकेकाळी या सेगमेंटवर राज्य करणारी मारुती सुझुकी ब्रेझा आता विक्रीत पिछाडीवर पडली आहे, तर टाटा नेक्सॉनने आपला दबदबा वाढवत सलग तिसऱ्या महिन्यात सर्वाधिक विक्रीचा विक्रम केला आहे.
या महिन्यात टाटा नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी पॅसेंजर कार ठरली. एकूण २२,४३४ युनिट्सची विक्री करत नेक्सॉनने गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४६ टक्के वार्षिक वाढ नोंदवली. फेस्टिव्ह सीझननंतरही नेक्सॉनची मागणी प्रचंड वाढलेली दिसत आहे.
याउलट, मारुती सुझुकी ब्रेझाची विक्री मात्र ग्राहकांच्या नजरेतून खाली उतरल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्यात ब्रेझाच्या १३,९४७ युनिट्सची विक्री झाली, जी मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्के कमी आहे.
नेक्सॉन आणि ब्रेझाच्या या लढाईत इतर कंपन्यांनीही जोरदार कामगिरी केली आहे:
किआ सोनेट : १२,०५१ युनिट्सची विक्री करत सोनेटने ३० टक्के वार्षिक वाढ नोंदवली.
ह्युंदाई वेन्यू : ११,६४५ युनिट्सची विक्री झाली आणि १९ टक्के वाढ दिसली. नुकत्याच लाँच झालेल्या नवीन मॉडेलमुळे वेन्यूच्या विक्रीत अधिक वाढ अपेक्षित आहे.
महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ : या मॉडेलला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, १०,६०१ युनिट्सची विक्री झाली आणि ३८ टक्के मोठी वाढ नोंदवली गेली.
१० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्राहक आता अधिक सुरक्षित, वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक पर्यायांना पसंती देत असल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे.