Mahindra XUV700 Waiting Period: वेळेत द्यायचीच नव्हती तर बुकिंग घेतली कशाला? आनंद महिंद्रांवर XUV 700 चे ग्राहक भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:27 IST2021-11-30T17:25:11+5:302021-11-30T17:27:16+5:30
Mahindra XUV700 Waiting Period: नोव्हेंबरपर्यंत 75 हजारहून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. पण आता पहिल्या मिनिटाला बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनीच आनंद महिंद्रांना चांगलेच सुनावले आहे.

Mahindra XUV700 Waiting Period: वेळेत द्यायचीच नव्हती तर बुकिंग घेतली कशाला? आनंद महिंद्रांवर XUV 700 चे ग्राहक भडकले
महिंद्रा ने गेल्याच महिन्यात मिड साईज एसयुव्ही Mahindra XUV700 लाँच केली. आजवर कोणत्याही कारला एवढा रिस्पॉन्स मिळाला नसेल तेवढा या एसयुव्हीला मिळाला आहे. काही मिनिटांत पहिल्या 25000 कार बुक झाल्या. नोव्हेंबरपर्यंत 75 हजारहून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. पण आता पहिल्या मिनिटाला बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनीच आनंद महिंद्रांना चांगलेच सुनावले आहे.
फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली असताना देखील ग्राहक निराश झाले आहेत. XUV700 चे बुकिंग रद्द करत आहे. अशावेळी महिंद्रा त्यांच्या बुकिंग अकाऊंटमधून 2100 रुपये कापून त्यांना उर्वरित रक्कम मागे दिली जात आहे. सध्या या एसयुव्हीच्या पेट्रोल व्हेरिअंटची डिलिव्हरी केली जात आहे. 30 ऑक्टोबरपासून कंपनीने डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली आहे. परंतू पहिल्या काही मिनिटांत ज्यांनी कार बुक केली त्यांना आता 9 महिने ते 1 वर्षाचा वेटिंग पिरिएड सांगितला जात आहे.
पुण्याचा ग्राहक अभिषेक पावसकर यांनीदेखील महिंद्रा एक्सयुव्ही 700 बुक केली होती. ते पहिल्या 25000 ग्राहकांमध्ये होते. सुरुवातीला त्यांना तीन महिन्यांत कार डिलिव्हर केली जाईल असे सांगितले जात होते. मात्र आता त्यांना मेल येऊ लागले आहेत. त्यामध्ये त्यांचा वेटिंग पिरिएड जून 2022 करण्यात आला आहे. यामुळे महिंद्राच्या या वर्तणावर भडकले आहेत. महिंद्राला ग्राहकांना अशी वागणूक देण्याची लाज वाटायला हवी.
वेटिंग पिरिएड वर्षाहून अधिक काळ लांबत गेल्याने ग्राहकांनी आता आनंद महिंद्रांनाच सुनावण्यास सुरुवात केली आहे. वेळेत द्यायची नव्हती तर एवढी बुकिंग घेतल्या कशाला, असा सवाल अनेकांनी त्यांना विचारण्यास सुरुवात केली आहे.
पहिला ग्राहक असला तरी...
डिलिव्हरीच्या बाबतीत येथे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हचा नियम लागू होत नाही. डिलिव्हरी अल्गोरिदमनुसार यामध्ये व्हेरिअंट, फ्युअल टाईप, ट्रान्समिशन टाईप, शहर आदी मुद्दे महत्वाचे असतात. या आधारे डिलिव्हरीची तारीख ठरविली जाते. पहिल्या दिवशी एका तासातच 25000 बुकिंग फुल झाले होते. यासाठी पहिल्या दिवशी जे बुक करतील त्यांना 50000 रुपये कमी असलेली किंमत जाहीर केली होती. दुसऱ्या दिवशी ही इन्ट्रोडक्टरी प्राईज वाढविण्यात आली होती.