हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:14 IST2025-12-16T15:14:25+5:302025-12-16T15:14:40+5:30
Hyundai Nexo Euro NCAP: ह्युंदाई नेक्सो ही कार चालताना धूर सोडण्याऐवजी केवळ पाणी आणि शुद्ध हवा सोडते. एकदा हायड्रोजन टाकी पूर्ण भरल्यावर ही कार सुमारे ६०० किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते.

हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
भविष्यातील इंधन मानल्या जाणाऱ्या हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्यांची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. यामध्ये 'ह्युंदाई नेक्सो' हे नाव आघाडीवर आहे. मात्र, ही कार केवळ पर्यावरणपूरकच नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही अत्यंत भक्कम असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या Euro NCAP क्रॅश टेस्टमध्ये या हायड्रोजन कारने उत्कृष्ट कामगिरी करत ५-स्टार रेटिंग पटकावले आहे.
हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षिततेचे ५-स्टार रेटिंग मिळवणारी ही जगातील पहिली कार ठरली आहे. प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेक्सोला ९४% गुण मिळाले आहेत. फ्रंटल आणि साइड क्रॅश टेस्टमध्ये कारने प्रवाशांना उत्तम संरक्षण दिले. लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत या कारला ८७% गुण मिळाले असून, विविध वयोगटातील मुलांसाठी कारमधील सुरक्षितता उत्तम असल्याचे दिसून आले.
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कारला ६७% गुण मिळाले आहेत. कारच्या बोनेट आणि बंपरची रचना धडक लागल्यास होणारी दुखापत कमी करण्यासाठी पूरक आहे. नेक्सोमधील 'लेन कीप असिस्ट' आणि 'ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग' सारख्या आधुनिक फीचर्समुळे तिला या श्रेणीत ८०% गुण मिळाले आहेत.
नेक्सोचे वैशिष्ट्य काय?
ह्युंदाई नेक्सो ही कार चालताना धूर सोडण्याऐवजी केवळ पाणी आणि शुद्ध हवा सोडते. एकदा हायड्रोजन टाकी पूर्ण भरल्यावर ही कार सुमारे ६०० किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते. हायड्रोजन गॅसच्या टाक्या कारच्या मागील भागात अशा प्रकारे सुरक्षित ठेवल्या आहेत की, मोठ्या धडकेनंतरही त्या फुटण्याचा किंवा गॅस गळतीचा धोका कमी राहतो.