जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:50 IST2025-09-09T16:50:36+5:302025-09-09T16:50:57+5:30
GST Cut Effect: ग्राहकांना गाडी घ्यायची तर आहे, पण ते २२ सप्टेंबरची वाट पाहत आहेत. तर शोरुमवाले जो आहे तो सगळा स्टॉक संपणार अशा अविर्भावात आहेत.

जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
- हेमंत बावकर
वाहनांच्या जीएसटी दरात कपात झाल्याने कधी नव्हे ते हिरो, होंडा, टीव्हीएससारख्या दुचाकींच्या शोरुममध्ये शुकशुकाट पसरलेला आहे. ग्राहकांना गाडी घ्यायची तर आहे, पण ते २२ सप्टेंबरची वाट पाहत आहेत. तर शोरुमवाले जो आहे तो सगळा स्टॉक संपणार अशा अविर्भावात आहेत.
२२ सप्टेंबरपासून वाहनांच्या शोरुममध्ये मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. कारण जीएसटी कपात या दिवसापासून लागू होणार आहे. अनेकजण जीएसटी कमी झाल्यानंतर शोरुममध्ये येऊन गेले आहेत, केवळ आताची किंमत विचारून गेले आहेत. त्यांना दुचाकी घ्यायची आहे परंतू आता नाही २२ तारखेनंतर असेही सांगून गेले आहेत.
सध्या लोक विचारत आहेत, ना कुठले कोटेशन दिले जात आहे ना कर्जप्रकरण केले जात आहे, असे काही शोरुम कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. बहुतांश शोरुममध्ये शुकशुकाट असून कर्मचारी बसून राहत आहेत. हिरो, होंडा, टीव्हीएससारख्या शोरुममध्ये हे हाल आहेत. अशातच आपल्याकडे जेवढा स्टॉक आहे तेवढा स्टॉक २२ सप्टेंबरनंतर पुढच्या ४-५ दिवसांत संपून जाईल असाही विश्वास या शोरुमवाल्यांना आहे.
अशी गर्दी केव्हा उडालेली...
कार, दुचाकींच्या शोरुममध्ये अशी गर्दी यापूर्वी बीएस ३ तून बीएस ४ जेव्हा झालेले तेव्हा उडालेली होती. लोकांनी लास्ट डेटच्या मध्यरात्रीपर्यंत शोरुम उघडे ठेवण्यास भाग पाडलेले होते. तशीच काहीशी गर्दी आता उसळण्याची शक्यता शोरुमवाल्यांनी वर्तविली आहे. सध्या आराम आहे, २२ सप्टेंबरपर्यंत काहीच काम नाहीय परंतू त्यानंतर मात्र घाईगडबड होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारच्या शोरुममध्येही अशीच परिस्थिती आहे.