जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:06 IST2025-09-05T18:05:49+5:302025-09-05T18:06:03+5:30
अल्टो, वॅगनआरपासून, नेक्सॉन, थ्रीएक्सओ, आय १०, आय २० अशा सर्वच प्रकारच्या कारच्या किंमतीत १० ते १५ टक्क्यांची कपात होणार आहे.

जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
जीएसटी कपातीमुळे नवीन कारवरीलजीएसटी जवळपास ६० ते दीड लाख रुपयांनी कमी झाला आहे. याचा फटका सर्वाधिक नुकत्याच कार घेतलेल्यांना आणि सेकंड हँड कार विक्रेत्यांना बसणार आहे. यामुळे डीलर्सच्या गोटात खळबळ उडाली आहे.
अल्टो, वॅगनआरपासून, नेक्सॉन, थ्रीएक्सओ, आय १०, आय २० अशा सर्वच प्रकारच्या कारच्या किंमतीत १० ते १५ टक्क्यांची कपात होणार आहे. यामुळे अगदी गेल्या दोन महिन्यांपर्यंत ज्यांनी कार घेतल्या आहेत, त्यांना पस्तावल्यासारखे वाटणार आहे. तर दुसरा फटका हा वापरलेल्या कार घेऊन कमिशनवर विकणाऱ्या कंपन्या, डीलरना बसणार आहे.
डीलर हे आधीच्या कार मालकाकडून एकसोएक कारणे सांगत किंमत पाडून कार घेतात आणि दुसऱ्या गिऱ्हाईकाला ती चढ्या दराने, खूप मार्जिन ठेवून विकतात. कोरोनापासून सेकंड हँड गाड्यांचे मार्केट एवढे वाढले आहे की किंमती पाहून नवीन कार घ्यावी असे अनेकांना वाटते, परंतू बजेट तेवढे नसते. परंतू, जीएसटीने या कार पुन्हा एकदा बजेटमध्ये आणल्या आहेत. यामुळे डीलरना आता चढ्या किंमती ठेवून चालणारे नाही. डीलरना तसेच दर पाडून कार विकाव्या लागणार आहेत.
या जीएसटी कपातीमुळे कारच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार असल्याने डीलरनाही आता मार्जिन कमी करून किंवा घेतलेल्या किंमतीपेक्षाही कमी दराने कार विकाव्या लागणार आहेत. एवढेच नाही तर ज्या लोकांना आपली जुनी कार विकायची आहे, त्यांनाही या जीएसटी दरात कपात झालेल्या किंमतीचा फटका बसणार आहे. या लोकांना त्यांच्या कारची अपेक्षित किंमत मिळणार नाही. म्हणजेच एकंदरीत जीएसटीचा फायदा नवीन कार घेणाऱ्यांना होणार असला तरी सेकंड हँड कार बाजारात हाहाकार उडालेला आहे.