आवडती चारचाकी महागणार; ई-वाहनांसह पेट्राेल-डिझेल कारच्या किमती वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 06:55 IST2022-12-10T06:54:55+5:302022-12-10T06:55:57+5:30
देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किमती ७ ते १० टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त ईव्हींना प्रोत्साहित करण्याच्या मोहिमेस धक्का लागण्याची शक्यता आहे.

आवडती चारचाकी महागणार; ई-वाहनांसह पेट्राेल-डिझेल कारच्या किमती वाढणार
मुंबई : ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर या महिन्यांमध्ये वाहनविक्रीचा टाॅप गिअर दिसला. मात्र, नव्या वर्षात हा वेग मंदावण्याची शक्यता आहे. लाेकांच्या पसंतीस उतरणाऱ्या ई-वाहनांसाेबतच पारंपरिक खनिज इंधनावर धावणाऱ्या वाहनांच्या किमतीत वाढ हाेणार आहे. सर्वच कार कंपन्यांनी जानेवारीपासून किमती वाढविण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे किमती वाढण्यापूर्वी ग्राहकांचा डिसेंबरमध्येच आवडती गाडी घेण्याकडे कल दिसू शकताे.
देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किमती ७ ते १० टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त ईव्हींना प्रोत्साहित करण्याच्या मोहिमेस धक्का लागण्याची शक्यता आहे. ईव्हीच्या उत्पादनामध्ये बॅटरीचा खर्च ४० ते ५० टक्के असतो. बॅटरी म्हणजे ई-वाहनांचे हृदयच. बॅटरी महाग झाल्यामुळे या गाड्यांसाठी जास्त पैसे माेजावे लागणार आहेत. यावर्षी सर्व प्रकारच्या ई-वाहनांच्या विक्रीत ८०० टक्के वाढ झाली आहे.
पेट्रोल-डिझेल कारही महागणार
मारुती-सुझुकी, टाटा मोटर्स, एमजी मोटर, किया, रेनो, मर्सिडीज-बेंज आणि ऑडी यांसारख्या कंपन्यांच्या सर्व कारच्या किमती जानेवारीपासून १.७ ते १५ टक्क्यांनी वाढणार आहेत.
किमतीत किती फरक पडणार?
बॅटरीच्या किमती वाढल्या आहेत. यंदा जगभरात लिथियम आयन बॅटरी पॅकच्या किमती सरासरी ७ टक्के महागल्या आहेत. भारतात मात्र बॅटरीच्या किमती तब्बल ५० ते ६० टक्के वाढल्या आहेत. गेल्या वर्षी ११,७०० ते १२,९०० रुपये प्रतिकिलोवॅट तासपर्यंत मिळणाऱ्या बॅटरी आता १४,८०० ते १८,९०० रुपयांवर गेल्या आहेत.
बॅटऱ्यांची कठाेर चाचणी हाेणार
ईव्हीमध्ये आग लागण्याच्या घटनांमुळे सरकारने बॅटरीसंबंधी नियम कडक केले आहेत. डिसेंबरपासून बॅटरींच्या चाचणीसाठी ‘एआयएस १५६’ मानक लागू होईल. बॅटरी उत्पादनात वापरली जाणारी खनिजेही महागली आहेत.
ही आहेत कारणे
लिथियम, कोबाल्ट, निकेल आदी खनिजे महागली आहेत.
चीनमधील लॉकडाऊनमुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे.
देशात बॅटरी परीक्षणाचे नियम कठोर झाले आहेत.
बॅटरीत वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक्स महागले आहे.
कार आणि दुचाकी वाहन विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. मात्र, आता या त्रासापासून पुन्हा एकदा दीर्घ मुदतीचा वाहन विमा आणण्याची शक्यता आहे. विमा नियामक ‘इरडा’ने कारसाठी ३ तर दुचाकींसाठी पाच वर्षांच्या विम्याचा प्रस्ताव दिला आहे. अशा प्रकारचा नियम २०१८ मध्ये आणला हाेता. मात्र, काेराेना काळात ताे मागे घेण्यात आला हाेता.