संकटाची चाहूल लागताच मालक उतरला; अवघ्या काही सेकंदांत स्कूटरनं पेट घेतला, अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 21:46 IST2022-05-02T21:46:18+5:302022-05-02T21:46:37+5:30
ई स्कूटरला आग लागण्याच्या वाढत्या घटना; सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

संकटाची चाहूल लागताच मालक उतरला; अवघ्या काही सेकंदांत स्कूटरनं पेट घेतला, अनर्थ टळला
कृष्णगिरी: पेट्रोलचे दर वाढल्यानं अनेकांनी ई स्कूटरला पसंती दिली. इलेक्ट्रिक दुचाकींचा खप वाढला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ई स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. कधी चार्ज करताना, तर कधी चालता चालता ई स्कूटर पेट घेत आहेत. तमिळनाडूत एका स्कूटरला आग लागली. आगीची चाहूल लागताच मालकांना स्कूटर थांबवली आणि तो दूर गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
तमिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातल्या होसूरमध्ये वास्तव्यास असलेल्या सतीश कुमार यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला शनिवारी अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. सीटच्या खाली आग लागल्याचं सतीश कुमार यांना योग्य वेळीच समजलं. त्यामुळे त्यांनी स्कूटर थांबवली आणि सुरक्षित अंतरावर गेले. त्यानंतर आग वाढली. आसपासच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. सतीश यांनी गेल्याच वर्षी स्कूटर खरेदी केली होती.
इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे ई-स्कूटर किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेल्लोर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी ई स्कूटरला लागलेल्या आगीत वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. स्कूटर चार्ज करत असताना हा प्रकार घडला. चार्जिंग सुरू असताना स्फोट झाला. त्या धुरात गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. अशा घटना सातत्यानं देशभरात घडत असल्यानं केंद्र सरकारनं उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.