डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:46 IST2025-11-09T14:46:01+5:302025-11-09T14:46:55+5:30
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भारत सरकारने डिझेलमध्ये देखील इथेनॉल मिक्स करून पाहिले होते. परंतू, हा प्रयोग अपयशी ठरला होता.

डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
पेट्रोलियम आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करून त्याची विक्री सुरु केली आहे. यावरून वाहनांच्या वाढलेल्या मेन्टेनन्स आणि कमी झालेल्या मायलेजवरून गदारोळ उठलेला असताना आता डिझेलमध्येही इशेनॉलचे रुप असलेला आयसोब्युटानॉल मिक्स करून त्याची टेस्टिंग सुरु करण्यात आली आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भारत सरकारने डिझेलमध्ये देखील इथेनॉल मिक्स करून पाहिले होते. परंतू, हा प्रयोग अपयशी ठरला होता. यानंतर आयसोब्युटेनॉल वापरण्याचा पर्याय पुढे आला. यावर कामही झाले असून टाटा कंपनीची अल्ट्रॉझ कारमध्ये डिझेल आणि आयसोब्युटेनॉल टाकून त्याची टेस्टिंग सुरु झाली आहे.
इथेनॉल मिश्रणाच्या बाबतीत अनेक व्यावहारिक अडचणी येत आहेत. इथेनॉल हे 'हायड्रोस्कोपिक' असते, म्हणजे ते आर्द्रता शोषून घेते. ज्यामुळे साठवणूक आणि वाहतुकीत समस्या येतात. मात्र, आयसोब्युटानॉलमध्ये हा धोका कमी असतो. ते आता डिझेलमध्ये वापरले जाणार आहे. तसेच आणखी एक फायदा म्हणजे आयसोब्युटानॉलची ऊर्जा घनता इथेनॉलपेक्षा जास्त आहे, त्यामुळे डिझेलमध्ये मिसळल्यावर ते इंजिनच्या कार्यक्षमतेवर कमी नकारात्मक परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आयसोब्युटानॉल इथेनॉलच्या तुलनेत कमी संक्षारक असते, त्यामुळे ते सध्याच्या पेट्रोल पाईपलाईन आणि वितरण पायाभूत सुविधांमधून सहजपणे वाहतूक केले जाऊ शकते. सध्या इथेनॉलची गुजरातहून सर्व देशात टँकरने वाहतूक सुरु आहे.
डिझेल मिश्रणाची गरज...
सध्या सरकार पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रण (E20) साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, परंतु डिझेल हा देशातील सर्वात मोठा वापरला जाणारा इंधन प्रकार आहे. डिझेलमध्ये आयसोब्युटानॉलचे मिश्रण केल्यास भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आणि पर्यावरणाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदत मिळेल, असा सरकारचा होरा आहे. परंतू, पेट्रोलच्या इथेनॉल वापराच्या दुष्परिणामांमुळे खासकरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका झाली होती. आता डिझेलमध्ये जर असे काही झाले तर गडकरींनाच प्रचंड रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.