Cheap Sedan Cars : ‘या’ स्वस्त फॅमिली सेडान कार्सची तुफान विक्री, किंमत ६.२० लाखांपासून, ३१ किमीचं मायलेज आणि बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 16:31 IST2023-03-29T16:30:41+5:302023-03-29T16:31:01+5:30
तुम्ही कार घेण्याच्या विचारात आहात का? पाहा कोणत्या आहेत या कार्स?

Cheap Sedan Cars : ‘या’ स्वस्त फॅमिली सेडान कार्सची तुफान विक्री, किंमत ६.२० लाखांपासून, ३१ किमीचं मायलेज आणि बरंच काही
भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट आणि परवडणाऱ्या सेडान कारला खूप मागणी आहे. फॅमिली सेडान कार म्हणून, काही कार्सनी फेब्रुवारी महिन्यात चमकदार कामगिरी केली आहे. कमी किमतीत उत्तम मायलेज आणि देखभालीच्या कमी खर्चामुळे बहुतेक लोक या कार्सना प्राधान्य देत आहेत. या कार केवळ किफायतशीर नसून त्यात बूटस्पेसही उत्तम आहे. ज्यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबासह बिंधास्त सामान घेऊन जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला सामान ठेवण्यासाठी चांगली जागा मिळते. आज आम्ही तुम्हाला देशातील अशा तीन सेडान कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची मागणी सर्वाधिक आहे आणि त्यांची सुरुवातीची किंमत फक्त 6.20 लाख रुपये आहे.
Maruti Dzire: मारुती सुझुकी डिझायर ही त्याच्या विभागातील सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात या सेडान कारच्या एकूण 16,798 युनिट्सची विक्री केली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या 17,438 युनिट्सपेक्षा सुमारे 4 टक्के कमी आहे. असे असूनही, ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार ठरली आहे. कंपनी लवकरच आपले नेक्स्ट जनरेशन मॉडेल बाजारात आणणार आहे.
एकूण चार ट्रिममध्ये येणारी ही कार पेट्रोल इंजिनसह CNG व्हेरिअंटमध्येही येते. या कारची किंमत 6.44 लाखांपासून ते 9.31 लाख रुपये आहे. ही कार एकूण 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात ऑक्सफर्ड ब्लू, मॅग्मा ग्रे, आर्क्टिक व्हाइट, फिनिक्स रेड, प्रीमियम सिल्व्हर आणि शेरवुड ब्राउन यांचा समावेश आहे. या कारमध्ये कंपनीने 1.2 लीटर क्षमतेचे ड्युअलजेट पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 90PS चा पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. तर CNG मोडमध्ये हे इंजिन 77PS पॉवर आणि 98.5Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारमध्ये 378 लीटरची बूट स्पेस उपलब्ध आहे. या कारचे पेट्रोल व्हर्जन 22.41 किमी पर्यंत आणि सीएनजी व्हेरिएंट 31.12 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.
Hyundai Aura: ह्युंदाई ऑरा ही फेब्रुवारी महिन्यात देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार ठरली आहे. कंपनीने या कालावधीत ऑराच्या एकूण 5,524 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात विकल्या गेलेल्या एकूण 3,668 युनिट्सपेक्षा जवळपास 51 टक्के अधिक आहे. या सेडान कारची मागणी अचानक वाढली असून बाजारात मारुती डिझायरची सर्वात जवळची स्पर्धक म्हणून या कारकडे पाहिले जात आहे.
पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही व्हेरिअंटमध्ये येणाऱ्या या कारची किंमत 6.30 लाख ते 8.87 लाख रुपयांदरम्यान आहे. फायरी रेड, स्टाररी नाईट (नवीन), एक्वा टील (नवीन), टायटन ग्रे, टायफून सिल्व्हर आणि पोलर व्हाईट अशा 6 रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे. कंपनीने या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन इंजिन वापरले आहे, जे 83PS पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले गेले आहे. ही कार CNG प्रकारात देखील उपलब्ध आहे, CNG मोडमध्ये हे इंजिन 69PS पॉवर आणि 95.2Nm टॉर्क जनरेट करते. या कारचे पेट्रोल व्हेरिअंट 20किमी प्रति लिटर आणि सीएनजी व्हेरिअंट 28 किमी प्रति किलोचे मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केलाय. यामध्ये 402 लिटरची बूट स्पेस देण्यात आलीये.
Tata Tigor: टाटा मोटर्सची परवडणारी सेडान टाटा टिगोर ही फेब्रुवारी महिन्यात देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार बनली आहे. कंपनीने या कारच्या एकूण 3,064 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 4,091 युनिट्स होती. या कारच्या विक्रीत जवळपास 25 टक्क्यांची घट झाली आहे. ही देशातील सर्वात सुरक्षित सेडान कारपैकी एक आहे. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत या कारला 4 स्टार रेटिंग मिळाले आहे.
आकर्षक लूक आणि शक्तिशाली इंजिन क्षमता असलेल्या या सेडान कारची किंमत 6.20 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 8.90 लाखांपर्यंत जाते. एकूण चार ब्रॉड ट्रिम्समध्ये येणारी ही कार कंपनी-फिट सीएनजीमध्ये येते. 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह व्हेरिएंट मध्येही ही कार उपलब्ध. याचे इंजिन पेट्रोल मोडमध्ये 86PS पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते, तर CNG मोडमध्ये हे इंजिन 73PS पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. या सेडान कारमध्ये 419 लीटर क्षमतेची बूट स्पेस देण्यात आली आहे. या पेट्रोल व्हेरिएंट 19.28 किमी आणि CNG व्हेरिएंट 26.49 किमी मायलेज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.
(या बातमीत कारच्या दिलेल्या किंमती या एक्स शोरुम किंमती आहेत.)