दुचाकी चालवून कंबरदुखी...! आता इतिहासजमा होणार ही तक्रार, केरळच्या इंजिनिअरने शोधली निंजा टेक्निक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 17:00 IST2023-10-12T16:59:45+5:302023-10-12T17:00:38+5:30
आता थोडेफार रस्ते चांगले असतात म्हणून बरे, परंतू आजही अनेकांना स्कूटर, मोटरसायकल चालवून कंबर दुखण्याचा त्रास होतोय. आता ही तक्रार इतिहासजमा होणार आहे.

दुचाकी चालवून कंबरदुखी...! आता इतिहासजमा होणार ही तक्रार, केरळच्या इंजिनिअरने शोधली निंजा टेक्निक
आपण अनेकदा आपल्या वडिलांना, काकांना दुचाकी चालवून कंबरदुखीचा त्रास झाल्याचे ऐकले असेल. आता थोडेफार रस्ते चांगले असतात म्हणून बरे, परंतू आजही अनेकांना स्कूटर, मोटरसायकल चालवून कंबर दुखण्याचा त्रास होतोय. आता ही तक्रार इतिहासजमा होणार आहे. होय, केरळच्या इंजिनिअरने अशी युक्ती शोधून काढली आहे की त्याचा आता त्याने पेटंटही रजिस्टर केला आहे.
कोचीतील ऑटोमोबाईल डीलरकडे नोकरीला असलेल्या हिसम ई.के. यानेहा शोध लावला आहे. केंद्राच्या पेटंट कार्यालयाने अॅडजस्टिबल हँडलबार इलेक्ट्रॉनिक व्हेरिएबल राईज बार याचे पेटंट नोंद केले आहे. २०१८ पासून पुढील २० वर्षांसाठी हे पेटंट त्याने मिळविले आहे. हे तंत्रज्ञान हँडल आणि फोर्क दरम्यान कोणत्याही दुचाकीवर बसविता येणार आहे. तसेच बाईक चालविणाऱ्याच्या स्थितीनुसार ते अॅडजस्टही करता येणार आहे. यासाठी टु वे स्विच हँडल देण्यात आले आहे.
कारमध्ये टिल्टेबल स्टीयरिंग व्हील आणि ड्रायव्हर्ससाठी अॅडजेस्टेबल सीट्स असतात. परंतू, दुचाकीवर मागे टेकण्यासाठी सपोर्ट नसतो. यामुळे सर्व उंचीच्या लोकांसाठी या दुचाकी योग्य नसतात. यामुळे या दुचाकीस्वारांची पाठदुखीची तक्रार असते. यामुळेच हँडलबार त्या दुचाकीस्वाराला त्याच्या सोईने, योग्य वाटेल तसा अॅडजस्ट करण्याची सोय या सिस्टिममध्ये केल्याचे, हिसम यांनी म्हटले आहे.
दुचाकीस्वार त्याच्या उंचीनुसार हँडलबारची उंची कमी जास्त करू शकणार आहे. ही यंत्रणा दुचाकी एका जागी थांबलेली असताना किंवा धावत असताना देखील वापरता येणार आहे. जेणेकरून रायडर त्याच्या सोईनुसार त्याचा अँगल अॅडजस्ट करू शकणार आहे. खासकरून महिलांसाठी देखील ही सिस्टिम फायद्याची ठरणार आहे. त्यांना कमी उंचीमुळे हँडल पकडण्यासाठी बरेचदा स्कूटरच्या सीटच्या टोकाला बसावे लागते.
ही यंत्रणा व्हॉईस कमांडनेही वापरता येणार आहे. या सिस्टिम तयार करण्यासाठी हिसम यांना पाच हजार रुपयांचा खर्च आला आहे. परंतू, जेव्हा याचे उत्पादन सुरु होईल तेव्हा याचा खर्च कमी होऊन किंमतही कमी होईल, असे हिसम यांचे म्हणणे आहे. हैदराबादच्या एका कंपनीने त्याच्याशी संपर्क साधला होता. परंतू, तेव्हा पेटंटची प्रक्रिया सुरु होती. यामुळे आजवर त्यांनी आपल्याच दुचाकीवर त्याची ट्रायल घेतली आहे.