Auto Expo 2018: होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लवकरच भारतीय बाजारपेठेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:14 IST2018-02-07T11:03:22+5:302018-02-07T11:14:08+5:30
यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील.

Auto Expo 2018: होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लवकरच भारतीय बाजारपेठेत
नवी दिल्ली: दिल्लीत सुरु असलेल्या Auto Expo 2018 मध्ये होंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेल्या Amaze चे अनावरण केले. ही कार यंदा भारतीय बाजारपेठेत दाखल होईल, असे यावेळी होंडाकडून सांगण्यात आले. बोल्ड एक्सटीरियर स्टाइल, प्रिमियम इंटीरियर आणि ड्रायव्हिंग परफॉर्मन्स ही Amaze कारची खास वैशिष्ट्ये आहेत. या गाडीची किंमत 5.48 ते 8.41 लाख इतकी असेल.
याशिवाय, होंडाकडून Auto Expo 2018 मध्ये 5th जनरेशनच्या CR-V आणि 10th जनरेशनच्या Civic या दोन गाड्याही ग्राहकांसमोर सादर करण्यात आल्या. यापैकी CR-V ही डिझेलवर चालणारी कार आहे. तर Honda Civic ही स्पोर्टस डिझाईन डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या गाडीत वैशिष्ट्यपूर्ण एलईडी हेडलॅम्प, बोल्ड कॅरेक्टर लाइन्स, स्पोर्टी अलॉय वील्स आणि एलईडी टेललॅम्प अशा सुविधा पाहायला मिळतील. यापूर्वी Honda Civic चे मॉडेल भारतात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. 2006 मध्ये ही गाडी भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदा लाँच करण्यात आली. त्यानंतर 2013 पर्यंत या गाडीचे भारतीय बाजारपेठेसाठी उत्पादन सुरू होते.
यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील. या एक्सपोमध्ये 100 कंपन्या सहभागी होणार आहेत. मागच्यावेळी 88 कंपन्या होत्या अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी दिली. विशेष म्हणजे मागच्यावर्षी एक्सपोमध्ये 11 स्टार्ट-अप कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी फक्त दोन कंपन्या सहभागी होणार आहेत. एसीएमएम, सीआयआय आणि सियाम या तिघांनी मिळून संयुक्तपणे ऑटो एक्सपो : द मोटर शो 2018 चे आयोजन केले आहे. या शो ला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेइकल मॅन्युफॅक्चर्स संघटनेची मान्यता आहे.
आठ लाखापेक्षा जास्त लोक या ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे. सर्वसामान्य 9 ते 14 जानेवारी दरम्यान सहभागी होऊ शकतात. या शो मध्ये 36 पेक्षा जास्त ऑटोमेकर्स आपल्या गाडया, एसयूव्ही, टू व्हीलर आणि कमर्शिअल वाहने प्रदर्शनासाठी मांडणार आहेत. इलेक्ट्रीक वाहने या ऑटो एक्सपोचे खास वैशिष्टय असेल. या ऑटो एक्सपोत बिझनेस हवर्समध्ये तिकीटाचे दर 750 रुपये आहेत. पब्लिक हवर्समध्ये तिकिटाची किंमत 350 रुपये आहे. बिझनेस हवर्स सकाळी 10 ते 1 पर्यंत असेल तर पब्लिक हवर दुपारी 1 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असेल. वीकएण्डला तिकिटाची किंमत 475 रुपये आहे.