6 Airbags Mandatory In Cars: गडकरींची महत्वाची घोषणा! सर्व कारमध्ये सहा एअरबॅग सक्तीच्या; दिली वर्षाची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 15:18 IST2022-09-29T15:17:16+5:302022-09-29T15:18:54+5:30
कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हा नवा नियम आणला आहे. याला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत होता.

6 Airbags Mandatory In Cars: गडकरींची महत्वाची घोषणा! सर्व कारमध्ये सहा एअरबॅग सक्तीच्या; दिली वर्षाची मुदत
प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर केंद्र सरकारने सर्व कारमध्ये सहा एअरबॅग सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून ही सक्ती करण्यात येणार होती, परंतू ती पुढील वर्षीच्या १ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नितीन गडकरींनी आज ही महत्वाची घोषणा केली.
कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हा नवा नियम आणला आहे. याला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत होता. ऑटो कंपन्यांचा सूर गाड्यांच्या किंमत आवाक्याबाहेर जाणार असा होता. सध्या देशात दोन एअरबॅगची सक्ती आहे. त्यात आणखी चारची भर पडणार आहे. यामुळे ५० ते ६० हजार रुपयांनी गाड्यांच्या किंमती वाढणार असल्याचा या कंपन्यांचा सूर होता.
आज केंद्रीय मंत्री गडकरी यांनी निर्णय जाहीर केला असून कंपन्यांना तयारीसाठी एक वर्ष दिले आहे. १ ऑक्टोबर २०२३ पासून सर्व कारमध्ये या एअरबॅग देण्यात येणार आहेत. यासाठी एम १ ही पॅसेंजर कारची कॅटेगरी ठरविण्यात आली आहे. ग्लोबल चेनमध्ये समस्या येत आहेत, यामुळे मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2020 मध्ये कारमधील 6 एअरबॅगमुळे 13,000 हून अधिक लोकांचे प्राण वाचू शकले असते, असे गडकरी म्हणाले होते.
बहुतांश खरेदीदार 6 एअरबॅगच्या पर्यायासह येणाऱ्या मॉडेलमध्येही दोन-एअरबॅग प्रकाराची निवड करतात, असाही कंपन्यांचा सूर होता. यामुळे सरकारने कंपल्सरीच केल्याने आता ग्राहकांना अधिकचे पैसे मोजून सहा एअरबॅगवाल्या गाड्या खरेदी कराव्या लागणार आहे.
याचबरोबर सरकारने सीटबेल्टही वापरण्यावर सक्ती केली आहे. गाडीत बसणाऱ्या सर्व प्रवाशांना सीटबेल्ट लावावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी गडकरींनी सीट बेल्ट रिमाईंडर ब्लॉकरवर देखील बंदी आणली होती.