कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:09 IST2025-11-04T12:08:44+5:302025-11-04T12:09:18+5:30
अमेरिकन नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी एडमिनिस्ट्रेशनने सप्टेंबर २०२५ मध्ये टेस्ला कारच्या डिझाईनची चौकशी सुरू केली होती.

कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादन कंपनी टेस्ला(TESLA) वर विस्कॉन्सिनमध्ये एक भीषण अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुर्घटना मागील वर्षी वेरोना इथं घडली होती. ज्यात Model S कारमध्ये प्रवास करणाऱ्या ५ जणांचा मृत्यू झाला होता. या कारच्या डिझाईनमध्ये असलेल्या त्रुटीमुळे त्यात बसलेल्या पॅसेंजरला आग लागल्यानंतर कारचा दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे हे ५ जण कारमध्येच अडकले आणि तिथे आगीत भाजून त्यांचा मृत्यू झाला.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ही दुर्घटना १ नोव्हेंबर २०२४ साली रात्री घडली. जेव्हा वेरोनामध्ये टेस्ला मॉडल एस कार रस्त्याशेजारील एका झाडाला आदळली. त्यावेळी कारमध्ये जेफ्री बाउर आणि मिशेल बाउर त्यांच्या मित्रांसोबत प्रवास करत होते. या कारची टक्कर इतकी भीषण होती की काही क्षणातच कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. कारला आग लागली तेव्हा आतून जोरजोरात किंचाळण्याचा आवाज येत होता. मात्र कुणालाही कारचा दरवाजा उघडता आला नाही. मागील ३१ ऑक्टोबरला मृत प्रवाशांच्या मुलांनी टेस्लावर खटला दाखल करण्याची मागणी केली.
या कारच्या इलेक्ट्रॉनिक डोअर सिस्टममध्ये अशा त्रुटी होत्या त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना बाहेर पडता आलेच नाही. कारला आग लागल्याने लिथियम आयन बॅटरी पॅकने इलेक्ट्रिक डोअर सिस्टमला निष्क्रिय केले. त्यामुळे दरवाजे उघडलेच नाही. टेस्ला कारला या त्रुटीबाबत आधीच माहिती होती कारण याआधीही असे अपघात झाले होते. तरीही कंपनीकडून सुरक्षेबाबत दुर्लक्ष करण्यात आले. कारच्या डिझाईनमध्ये कुठलाही बदल केला नाही असा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याआधीही टेस्ला इलेक्ट्रिक कारच्या सेफ्टी सिस्टम आणि डिझाईन फिचर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, अमेरिकन नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी एडमिनिस्ट्रेशनने सप्टेंबर २०२५ मध्ये टेस्ला कारच्या डिझाईनची चौकशी सुरू केली होती. यात अपघातानंतर टेस्ला कारचे डोअर हँडल्स फेल होऊ शकतात असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी दुर्घटनेतून बचाव व्हावा म्हणून फ्लोअर मॅट हटवून मेटेल टॅब शोधावे लागते. अपघातावेळी कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीसाठी ते अशक्य आहे असंही मृत कुटुंबाने त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे. चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवले त्यातून हा भयंकर अपघात घडला. त्यामुळे ड्रायव्हरलाही प्रतिवादी करण्यात आले आहे.