Two persons fell into a ditch in Dabrul Shivara and died on the spot | दाबरूळ शिवारात दुचाकी खड्ड्यात पडून दोन जण जागीच ठार

दाबरूळ शिवारात दुचाकी खड्ड्यात पडून दोन जण जागीच ठार

पाचोड : रोहिलागड येथून दुचाकीवर भावाकडे जात असताना शुक्रवारी रात्री दुचाकी एका ख़ड्ड्यात आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. पण या घटनेची माहिती शनिवारी सकाळी उघडकीस आली असल्याचे पाचोड पोलिसांनी सांगितले. अनिस गफूर पठाण (४०), संगीता उर्फ राहीबाई कांबळे (५०) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिस गफूर पठाण (४०, रा. बीड, हल्ली मुक्काम रोहिलागड) हे रोहिलागड येथे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना बीडला जायचे होते. त्यांनी आपतगाव येथे रहात असलेल्या भावाला फोन करून सांगीतले की, मी व माझ्यासोबत एक महिला असून दोघे जण दुचाकीरून आपतगाव येथे येत आहे. जेवण करून तुझ्याकडे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्हाला बीडला जायचे आहे, असा निरोपही दिला. ठरल्याप्रमाणे अनिस पठाण व त्यांच्यासोबत संगीता उर्फ राहीबाई कांबळे (५०) हे दोघे दुचाकीवरून बीडच्या दिशेने निघाले. दाबरूळ शिवारातून जात असताना दुचाकी रस्त्याच्या लगत असलेल्या एका खड्ड्यात आदळली. यात दोघेही जागीच ठार झाले. शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाल्याने कोणाच्या लक्षात आलेच नसावे. शनिवारी सकाळी ही बाब उघडकीस आली.

पोलिसांनी घेतली धाव

पोलिसांना माहिती मिळताच सपोनि अतुल येरमे , पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलीस जमादार आबासाहेब कणसे व विलास काकडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करीत दोन्ही मृतदेहाला पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. आपतगाव येथे रहात असलेल्या सुलेमान पठाण या नातेवाइकाला माहिती दिली. पाचोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी व आबासाहेब कणसे करीत आहेत.

Web Title: Two persons fell into a ditch in Dabrul Shivara and died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.