...म्हणे पुरवठादारांकडून प्रशिक्षण; टँकरचालकच भरतो टँकमध्ये ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 02:21 PM2021-04-22T14:21:40+5:302021-04-22T14:23:05+5:30

oxygen supply in Aurangabad रुग्णालयातील टेक्निशियन लक्ष ठेवत असल्याचा दावा

... says training from suppliers; The tanker driver fills the tank with oxygen | ...म्हणे पुरवठादारांकडून प्रशिक्षण; टँकरचालकच भरतो टँकमध्ये ऑक्सिजन

...म्हणे पुरवठादारांकडून प्रशिक्षण; टँकरचालकच भरतो टँकमध्ये ऑक्सिजन

googlenewsNext
ठळक मुद्देही चूक बेतू शकते रुग्णांच्या जिवावर

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : काेरोनाच्या विळख्याने हजारो रुग्णांचा श्वास ऑक्सिजनवर सुरू आहे. त्यासाठी रुग्णालयांमध्ये मोठमोठे लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात आले आहे. ऑक्सिजन संपला की या टँकमध्ये पुन्हा लिक्विड ऑक्सिजन भरले जाते. हे लिक्विड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्याचे काम, जो ऑक्सिजन घेऊन येतो, तो टँकरचालकच करतो. त्यासाठी ऑक्सिजन पुरवठादारांकडूनच चालकांना विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.

नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. औरंगाबादेत कोरोनाचे सर्वाधिक गंभीर रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल आहेत. सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे घाटीत गेल्या काही दिवसांत लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात आला. कोरोना रुग्ण वाढल्याने सध्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. परिणामी, घाटीत रोज ऑक्सिजन टँकर दाखल होत आहे. टँकरचालकच टँकमध्ये ऑक्सिजन भरण्याची प्रक्रिया पार पाडतो. त्यावर रुग्णालयातील टेक्निशियन रिफिलिंग कसे चालते, यावर देखरेख ठेवतो.

असे भरले जाते टँकमध्ये ऑक्सिजन
टँकर आणि लिक्विड ऑक्सिजन टँक यांच्यात एक होस पाइप लावला जातो. त्यानंतर टँकरमधून टँकमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरले जाते. या टँकला एक टाॅप सिलिंग वाॅल असतो आणि दुसरा बाॅटम सिलिंग वाॅल असताे. टाॅप सिलिंगमधून ऑक्सिजन भरताना टँकचे प्रेशर कमी होते, तर बाॅटम सिलिंगमधून भरताना प्रेशर वाढते. त्यामुळे दोघांचा समतोल राखून ऑक्सिजन भरावा लागतो. टँकमध्ये ऑक्सिजन भरून झाल्यानंतर लिक्विड वेपराईजरपर्यंत पोहोचते. तेथून ऑक्सिजन गॅस तयार होतो. त्यानंतर रेग्युलेटरवर प्रेशर नियंत्रित करून ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोहोचतो.

ही चूक बेतू शकते रुग्णांच्या जिवावर
टँकच्या केवळ टाॅप सिलिंग वाॅलमधून ऑक्सिजन भरले तर प्रेशर कमी होऊन रुग्णांपर्यंत होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडित होण्याची भीती असते. टँकमध्ये प्रेशर असते. त्यामुळे व्हॉल्व्ह जर गतीने उघडला तर दुर्घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही. टँकचे प्रेशर योग्य राखावे लागते. त्यात घट अथवा वाढ झाली तर त्याचा थेट परिणाम रुग्णांपर्यंत पोहोचणाऱ्या ऑक्सिजनवर होतो.

चार ठिकाणची गळती केली बंद
मेडिसीन विभागातील ऑक्सिजन पुरवठ्यातील चार ठिकाणची गळती काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. नाशिकच्या घटनेमुळे गळतीकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

आवश्यक ती खबरदारी
नाशिकच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घाटीतील ऑक्सिजन टँकची पाहणी करण्यात आली. सध्यातरी कोणतीही अडचण नाही. आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. गळती शोधण्याचे काम गेल्या काही दिवसांत काम करण्यात आले. रुग्णालयात ऑक्सिजन समितीही आहे. काही प्रश्न उद्भवला तर तत्काळ योग्य नियोजन केले जाते.
- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

जबाबदारी ही टँकरचालकांची
ऑक्सिज टँकमध्ये भरण्याची जबाबदारी ही टँकरचालकांची आहे. त्यासाठी टँकरचे चालक हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे रिफिलिंग तेच करू शकतात. प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीने ते करणे योग्य नाही. आमच्याकडे २ टेक्निशियन आहेत. ते कधीही उपलब्ध असतात. रिफिलिंग कसे चालते, यावर ते लक्ष ठेवतात.
-डाॅ. अमोल जोशी, प्राणवायू समिती कार्यकारी प्रमुख, घाटी

घाटीतील स्थिती
एकूण ऑक्सिजन टँक-७
टँकची एकूण क्षमता - ३३ टन
रोजची मागणी- १६ ते १८ टन
दाखल रुग्ण-६२२

Web Title: ... says training from suppliers; The tanker driver fills the tank with oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.