सॅटेलाईट फोनसह पोलंडचा नागरिक औरंगाबादेत ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:31 AM2020-02-07T11:31:39+5:302020-02-07T11:33:45+5:30

अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.

Polish citizen with satellite phone arrested in Aurangabad | सॅटेलाईट फोनसह पोलंडचा नागरिक औरंगाबादेत ताब्यात

सॅटेलाईट फोनसह पोलंडचा नागरिक औरंगाबादेत ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देभारतात सॅटेलाईट फोन वापरण्यास प्रतिबंध आहे.न्यायालयाने दंड ठोठावून केली मुक्तता

औरंगाबाद : भारतात बंदी असलेला सॅटेलाईट फोन घेऊन चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या पोलंडच्या नागरिकाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. हा प्रकार गुरुवारी (दि.६) सकाळी घडला.

डॅमियन रोमन झेल्नसिकी (२६, रा. पोलंड) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, डॅमियन हा स्वयंसेवी संस्थेच्या कामासाठी पाचोड (ता. पैठण) येथे आला होता. काम आटोपून गुरुवारी सकाळी तो स्पाईस जेटच्या विमानाने दिल्लीला जाण्यासाठी चिकलठाणा विमानळावर आला. सीआयएसएफच्या जवानांनी त्याची बॅग एक्स रे मशीनमधून तपासली तेव्हा तीत संशयित वस्तू असल्याचे निदर्शनास आले. झडतीत बॅगमध्ये सॅटेलाईट फोन आढळला. भारतात सॅटेलाईट फोन वापरण्यास प्रतिबंध आहे. ही माहिती विमानतळ प्रशासनाने पोलिसांना कळविली आणि डॅमियनला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. 

पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक कैलास अन्नलदास यांनी डॅमियनला ताब्यात घेतले आणि सॅटेलाईट फोन जप्त केला. तो भारतात कधी आला, औरंगाबादेत येण्याचे कारण काय, येथे किती दिवस थांबला, मुक्कामी कु ठे होता, सॅटेलाईट फोन त्याने कुठे खरेदी केला, आदी प्रश्नांची सरबत्ती डॅमियनवर करण्यात आली. तेव्हा त्याने पाचोड येथील आशिष ग्रामरचना ट्रस्ट या सेवाभावी संस्थेची कागदपत्रे नेण्यासाठी दि.१ रोजी औरंगाबादेत आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय बिनतारी तारा यंत्र अधिनियम १९३३ च्या कलम ६ आणि सहकलम भारतीय टेलिग्राफ अ‍ॅक्ट कलम २० नुसार एमआयडीसी सिडको ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. डॅमियनने त्याच्या सॅटेलाईट फोनवरून काठमांडू येथे नातेवाईकाशी संवाद साधला होता. तेथून तो दिल्लीमार्गे औरंगाबादेत आला. या विमान प्रवासात त्याचा फोन लगेज बॅगेत असल्याने तो स्कॅनमध्ये आला नसावा, असे पोलिसांनी सांगितले. 

न्यायालयाने दंड ठोठावून केली मुक्तता
तपास अधिकारी उपनिरीक्षक कैलास अन्नलदास, पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे यांनी झटपट तपास करून आरोपी डॅमियनविरुद्ध साडेचार तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने डॅमियनला दोषी ठरवून वेगवेगळ्या कलमांखाली ११०० रुपये दंड ठोठावला आणि फोन जप्त केला. डॅमियनने हा दंड भरल्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली.
 

Web Title: Polish citizen with satellite phone arrested in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.