पाचोड ठरले कोरोनाचा हॉट स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:02 AM2021-05-04T04:02:21+5:302021-05-04T04:02:21+5:30

संजय जाधव पैठण : शहरी भागात लॉकडाऊन नागरिकांच्या अंगवळणी पडल्याचे चित्र आहे. परंतु, दुसरीकडे ग्रामीण भागात लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले ...

Pachod became Corona's hot spot | पाचोड ठरले कोरोनाचा हॉट स्पॉट

पाचोड ठरले कोरोनाचा हॉट स्पॉट

googlenewsNext

संजय जाधव

पैठण : शहरी भागात लॉकडाऊन नागरिकांच्या अंगवळणी पडल्याचे चित्र आहे. परंतु, दुसरीकडे ग्रामीण भागात लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले जात नसल्याने कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. पैठण तालुक्यातील ६० टक्के गावांत कोरोनाने शिरकाव केला असून, बाधितांचा आकडा पावणेपाच हजारांच्या घरात पोहोचला. स्थानिक पातळीवर तातडीने आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने आतापर्यंत ५९ रुग्णांनी जीव गमावला आहे. यात तालुक्यातील पाचोड हे कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून पुढे आले आहे.

सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी ग्रामीण भागात फारसे नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. बाजारपेठ असलेल्या गावात सर्रासपणे दुकाने उघडी असून नागरिकांची वर्दळ दिसते. प्रशासकीय यंत्रणाही याकडे कानाडोळा करत असल्याने ग्रामस्थांचा मुक्तसंचार असतो. पैठण तालुक्यातील १९१ महसुली गावांपैकी ११६ गावांत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात पैठण शहरात नवीन रुग्णांची संख्या घटत असल्याने दिलासा मिळाला. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या काळजीत टाकणारी आहे.

पैठण तालुक्यात आतापर्यंत ४ हजार ७३७ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी ३ हजार ९६४ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. आजघडीला ७१४ रुग्णांवर उपचार सुरू असून ५९ जणांचा मृत्यू झाला आहे.

------------

ग्रामीण भाग

ग्राम समितीच्या भरवशावर

शहरी भागात नगरपरिषद, महसूल व पोलीस विभागाची सातत्याने नजर असल्याने लॉकडाऊन यशस्वी होत आहे. पण दुसरीकडे ग्रामीण भागाची भिस्त कोरोना ग्राम समितीवर सोपविण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या या समितीत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे. गावातील कन्टेंमेंट झोन, क्वारन्टाईन व्यक्ती, गावात नवीन आलेल्या व्यक्ती, लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. मात्र समितीमधील तलाठी, ग्रामसेवकांसह इतर कर्मचारी गावातच राहत नाहीत. सरपंच नागरिकांना थेट विरोध करू शकत नसल्याने क्वारन्टाईन केलेले बिनबोभाट गावभर फिरतात. यामुळे ग्रामीण भागात लॉकडाऊन नसल्यासारखे चित्र आहे.

------------------

पाचोडमध्ये सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूदेखील

पैठण तालुक्यात पाचोड हे व्यापारी दृष्टिकोनातून मोठे गाव आहे. त्यामुळे दिवसभरात शेकडो नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येतो. लॉकडाऊनचे निर्बंध सहसा पाळले जात नसल्याने तालुक्यातील सर्वाधिक १८१ रुग्ण पाचोडमध्ये आढळून आले असून, यातील १० जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला. आजही नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यापाठोपाठ बिडकीनमध्ये ११५, चितेगावात ९५, पिंपळवाडीत ८७, विहामांडव्यात ८५ रुग्ण आढळले आहेत. तसेच केकत जळगाव १, हार्षी १, पाचोड खुर्द २, पाचोड बु. ३, तर गेवराई मर्दा येथे ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

-----------

पैठण रुग्णालयात येणार ३४

ऑक्सिजन बेड्‌स

पैठण तालुक्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात नवीन कोविड सेंटर सुरू केले. घाटीच्याअंतर्गत येणाऱ्या पैठण शहरातील रुग्णालयात ३४ ऑक्सिजन बेड्‌स मंजूर केले असून बेड्‌सची यंत्रणा उभारण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे प्रपाठक डॉ. भारत चव्हाण यांनी सांगितले. व्हेंटिलेटरअभावी काही ठिकाणी रुग्णांचा जीव जात असताना पाचोड रुग्णालयातील दोन व्हेंटिलेटर, त्यासंबंधीचे तज्ज्ञ नसल्याने वापराविना पडून आहेत.

Web Title: Pachod became Corona's hot spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.